निनाद देशमुख।लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : कारगील युद्धात भारताने विजय मिळविला, त्याला रविवार, २६ जुलैला २१ वर्षे पूर्ण होत आहेत. या २१ वर्षांत पाकिस्तानने भारतात अनेक अतिरेकी कारवाया केल्या, परंतु रणांगणात भारत पाकिस्तानला कायम वरचढ ठरला आहे. त्यामुळे पाठीमागून हल्ला करण्याचीच पाकची निती आहे. आता पाकिस्तानपेक्षा भारताला खराखुरा सामना करावा लागणार आहे चीनशीच.
चीनने आता लडाख भगत जशी घुसखोरी केली, तशीच पाकिस्तानने १९९९ साली कारगिलमध्ये केली होती. कारगिल-द्रास सेक्टरमध्ये लढल्या गेलेल्या चौथ्या युद्धात २६ जुलै १९९९ रोजी भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला. या संपूर्ण मोहिमेला आॅपरेशन विजय नाव दिले होते. हिवाळ्यातील महिन्यांमध्ये पाकिस्तान घुसखोरी करीत असल्याचे मेंढपाळांना दिसले. पाकने १३० ते २०० चौरस किलोमीटर प्रदेश ताब्यात घेतला होता.
घुसखोरांना परत माघारी धाडण्यासाठी लष्कराने ‘आॅपरेशन विजय’ मोहीम आखली. डोंगराळ प्रदेश असल्याने भारतीय जवांना अनेक अडचणी आल्या. मात्र, बोफोर्स तोफांचा मारा करत तसेच थेट उंचपर्वत रांगा सर करत भारतीय जवानांनी हे युद्ध जिंकले. भारतीय वायुसेनेकडूनही ‘आॅपरेशन सफेद सागर’ सुरू केले. या आॅपरेशनाद्वारे पायदळ सैन्याची ने-आण करण्याची मोठी भूमिका वायुसेनेने निभावली. मोठे बॉम्ब वाहून नेण्यासाठी लागणारे मोठे विमानतळ, भौगोलिक परिस्थितीमुळे नसतांनाही वायुदलाने मोठी भूमिका बजावली.संरक्षण दलात आमूलाग्र बदलया युद्धानंतर आढावा समितीच्या शिफारशीनुसार देशाच्या संरक्षण दलांत अनेक बदल केले. मात्र, आता सीमावर्ती भागात पायाभूत सुविधांचा विकास करावा लागेल. आतापर्यंतचे परराष्ट्र धोरण पास्किस्तानला केंद्रबिंदू धरून होते. मात्र, पाकिस्तानपेक्षा चीन ही भारताची खरी दुखरी नस असून त्यादृष्टीने व्यवरचनात्मक आणि राजनैतिक पातळीवर बदल करने गरजेचे आहे.पाकिस्तानचे सैन्य भारतात घुसलेच कसे, असा प्रश्न विचारत त्या वेळी गुप्तचर विभागावर दोष ठेवण्यात आले होते. भारतीय जवानांनी भूभाग परत मिळवला. मात्र, त्यानंतर के. सुब्रम्हण्यम समितीने परराष्ट्र व संरक्षण धोरणात अनेक बदल सुचवले. त्यानुसार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार व चीफ आॅफ डिफेन्स स्टाफची निर्मिती झाली. गुप्तचर यंंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी काही बदल केले गेले.
पण आता पाकिस्तान नव्हे, तर चीन शत्रू म्हणून सीमेवर उभा आहे. त्या दृष्टीने संरक्षण सिद्धतेत वाढ करण्याची गरज आहे. भारताने गेल्या काही वर्षात फॉरवर्ड डिप्लोमसी अंगीकारली आहे. पाकला सडेतोड उत्तर दिले. मात्र, आता हीच भूमिका चीनबाबत घ्यायची आहे. लष्करी क्षमतांच्या तुलनेत चीन भारतापेक्षा बराच पुढे आहे. त्यामुळे युध्दाची तयारी ठेवत भारताने आंतराष्ट्रीय स्तरावर चीनच्या व्यूवरचनेचा अभ्यास करून त्यांना शह द्यावा लागणार आहे.