नवी दिल्ली : ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर इलॉन मस्क यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन नियम केला आहे. त्यानुसार, कर्मचाऱ्यांना एका दिवसात १२ तास तसेच आठवड्यात ७ दिवस काम करावे लागणार आहे. नियम मोडणाऱ्यास नोकरीवरून काढण्यात येणार आहे. ट्विटरमध्ये बदल घडविण्यासाठी इलॉन मस्क यांनी कठोर डेडलाइन ठरवली आहे. त्यासाठी नवीन नियम करण्यात आले आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
एका वृत्तात म्हटले आहे की...
ट्विटरच्या व्यवस्थापकांनी इलॉन मस्क यांच्या डेडलाईनचे उद्दिष्ट लवकरात गाठण्यासाठी कर्मचाऱ्यांना १२ तासांची शिफ्ट आणि ७ दिवसांचा आठवडा हा नियम कठोरपणे पाळण्याच्या सूचना अंतर्गत परिपत्रक जारी करून केल्या आहेत. कर्मचाऱ्यांनी ओव्हरटाइम, कॉम्पटाइम अथवा नोकरीची सुरक्षा यांबाबत कोणतीही चर्चा न करता जास्तीचे तास काम करावे, अशा कडक सूचना देण्यात आल्या आहेत. त्या न पाळल्यास कामावरून काढले जाऊ शकते. ट्विटरच्या ५० टक्के कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याची धमकी इलॉन मस्क देत आहेत.
७ नोव्हेंबरची डेडलाइन
प्राप्त माहितीनुसार, इलॉन मस्क यांनी ट्विटर ब्ल्यू सबस्क्रिप्शनचे मूल्य वाढविण्याची योजना बनविली आहे. तसेच ब्ल्यू टिक पडताळणीच्या प्रक्रियेतही सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आवश्यक बदल करण्यासाठी ट्विटरच्या अभियंत्यांना ७ नोव्हेंबरची डेडलाइन देण्यात आल्याचे समजते. ७ तारखेपर्यंत ‘देय पडताळणी’चे (पेड व्हेरिफिकेशन) फीचर लाँच करा, अन्यथा घरी जा, असा दमच मस्क यांनी अभियंत्यांना भरला असल्याचे समजते. इतर बदलांसाठीही हीच डेडलाइन असल्याची माहिती आहे.
अधिक महसुलाची गरज
सूत्रांनी सांगितले की, मस्क यांना ब्ल्यू टिक बॅजद्वारे पैसे कमवायचे आहेत. बॅजच्या किमतीवरून मस्क यांच्यावर टीका होत आहे. आधी या सबस्क्रिप्शनसाठी १९.९९ डॉलरचे (सुमारे १,६०० रुपये) शुल्क ठेवण्याचा ट्विटरचा विचार होता. मात्र, टीकेनंतर मस्क यांनी शुल्क ८ डॉलर म्हणजेच ६६० रुपये करण्यावर सहमती दर्शविली, असे समजते. याबाबत स्पष्टीकरण देताना मस्क यांनी म्हटले की, ‘ट्विटर प्लॅटफॉर्मला अधिक महसुलाची गरज आहे. महसुलाच्या बाबतीत केवळ जाहिरातींवर अवलंबून राहता येऊ शकत नाही.’ प्राप्त माहितीनुसार, इलॉन मस्क यांना ट्विटर प्लॅटफॉर्मचा संपूर्ण कायापालट करायचा आहे. त्यानुसार, ते योजना आखत आहेत. मस्क यांच्या योजना ट्विटरच्या कर्मचाऱ्यांसाठी मात्र ‘करा किंवा मरा’ या स्वरूपाच्या ठरल्या आहेत.