गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर आणि सर्वाधिक काळ वकिली करणारे ज्येष्ठ वकील पी. बालासुब्रह्मण्यम मेनन ९८ वर्षांचे झाले आहे. मात्र त्यांनी वकिली सोडलेली नाही. मी सध्यातरी निवृत्तीबाबत विचार करत नाही आहे. मला जेवढं शक्य होईल, तेवढं काम करेन, मी ९८ वर्षांचा झालो आहे. अजूनही मी काम करतो आणि उपजीविका चालवतो, असे मेनन यांनी सांगितले.
बार अँड बेंचने दिलेल्या वृत्तानुसार पी. बालासुब्रह्मण्यम मेनन यांनी हल्लीच जगात सर्वाधिक काळ सेवा देणारे वकील म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपलं नाव नोंदवलं आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे त्यांचं वय ९८ वर्षे आहे. तसेच वकिलीमध्ये त्यांनी ७३ वर्षे ६० दिवस पूर्ण केले आहेत. त्याबरोबरच त्यांनी जिब्राल्टरमधील वकील लुईस ट्राय यांचं ७० वर्षे ३११ दिवसांचं रेकॉर्ड मोडलं आहे.
आपल्या कारकिर्दीबाबत पी. बालासुब्रह्मण्यम मेनन यांनी सांगितले की, माझं नाव गिनिज वर्ल्ड रेकॉरडमध्ये नोंदवलं जाईल, असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. मेनन यांनी वकिलीची सुरुवात १९५० मध्ये केली होती. १९५२ मध्ये त्यांनी सिव्हिल लॉमध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलं. वकिलीमध्ये ७३ वर्षे पूर्ण केली असली तरी वकिली हा मेनन यांच्या आवडीचा पहिल्या पसंतीचा पेशा नव्हता. भावंडांसोबत इंजिनियरिंग आणि मेडिकलचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांच्या आई-वडिलांनी त्यांच्यासाठी कायद्यामध्ये करिअर घडवण्याचं स्वप्न पाहिलं. हे स्वप्न त्यांनी लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन पूर्ण केले.
मेनन यांनी सुरुवातीला मद्रास हायकोर्टामध्ये अॅडव्होकेट जनरल म्हणजेच महाधिवक्ता यांचे ज्युनिअर म्हणून दोन वर्षे काम केले. त्यानंतर आई-वडिलांच्या आग्रहावरून ते पलक्कड येथे आले. कायद्यामध्ये रुची नसूनही त्यांनी मुख्य रूपाने गुन्हेगारी खटले चालणाऱ्या कोर्टांमध्ये सहभाग घेतला. एकदा कोचीमध्ये एका खटल्यात पीठासीन न्यायाधीश त्यांच्या युक्तिवादामुळे प्रभावित झाले आणि त्यांना नागरी कायद्यामध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी प्रेरित केले. मेनन या घटनेला आपल्या जीवनातील टर्निंग पॉईंट मानतात.