निवृत्तीनंतर अग्निवीरांना रेल्वेत रोजगाराची संधी; रेल्वे मंत्र्यांकडून लवकरच मिळेल मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 04:39 PM2022-06-27T16:39:01+5:302022-06-27T16:39:19+5:30
Agneepath Scheme: सैन्यात 4 वर्षे सेवा दिलेल्या अग्निवीरांना रेल्वे विभागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याची योजना आखली जात आहे.
नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या नवीन अग्निपथ योजनेविरोधात देशभरात गदारोळ सुरू आहे. सैन्यात 4 वर्षे सेवा दिलेल्या अग्निवीरांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी सरकार विविध योजनांवर काम करत आहे. याअंतर्गत रेल्वे विभागात अग्निवीरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची योजना आखली जात आहे. याबाबत आराखडा तयार असून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची मंजुरी मिळणे बाकी आहे.
लष्करातील भरतीसाठी सुरू करण्यात आलेल्या अग्निपथ योजनेला देशभरातून विरोध होत आहे. केवळ चार वर्षे सैन्यात सेवा केल्यानंतर अग्निवीरांना हाकलून देणे योग्य नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. यानंतर हे अग्निवीर बेरोजगार होतील आणि त्यांना कुठेही काम मिळणार नाही. याशिवाय लष्कराच्या क्षमतेवरही त्याचा परिणाम होणार आहे, असे अनेकांचे म्हणणे आहे. दुसरीकडे, सरकारचे म्हणणे आहे की सैन्यातून आल्यानंतर स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी आणि नवीन रोजगार देण्यासाठी सरकार संपूर्ण मदत करेल.
स्थानकांवर स्टॉल्स मिळतील
मीडिया रिपोर्टनुसार, रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की, अग्निवीरांना रेल्वेमध्ये रोजगार देण्यासाठी ब्लू प्रिंट तयार करण्यात आली आहे. अग्निवीरांना रोजगार देण्यासाठी “एक स्टेशन, एक उत्पादन” योजनेअंतर्गत स्टॉल्स दिले जातील. या योजनेअंतर्गत प्रत्येक शहरातील स्थानिक लोकप्रिय उत्पादनाची विक्री करण्यासाठी प्रत्येक प्लॅटफॉर्मवर किमान दोन कायमस्वरूपी स्टॉल उघडले जातील.
या उत्पादनांचा समावेश
या स्टॉल्सच्या मदतीने ते त्यांचा स्वयंरोजगार सुरू करू शकतील आणि सैन्यातून आल्यानंतर त्यांना बेरोजगार राहावे लागणार नाही. तसेच, यामुळे प्रत्येक प्रदेशातील स्थानिक उत्पादनांचे ब्रँडिंग होईल, असा रेल्वेचा विश्वास आहे. हस्तकला, कापड, हातमाग, पारंपारिक वस्त्रे, स्थानिक कृषी उत्पादने इत्यादींचा वन स्टेशन एक उत्पादन योजनेत समावेश करण्यात आला आहे.