अग्निवीरांना चार वर्षांनंतर भाजपा कार्यालयांसाठी सुरक्षा रक्षक म्हणून प्राधान्य: कैलास विजयवर्गीय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 03:12 PM2022-06-19T15:12:40+5:302022-06-19T17:41:22+5:30
Kailash Vijayvargiya On agneepath Scheme : विजयवर्गीय यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काँग्रेससह राजकीय पक्षांनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.
भारतीय सैन्यासाठी कंत्राटी पद्धतीने सैन्य भरतीसाठी केंद्र सरकारने अग्निपथ ही योजना घोषित केली आहे. त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून बिहारसह देशभरातील डझनभर राज्यांत संतप्त तरुणांनी हिंसक आंदोलन केले. रेल्वे गाड्या, बसेस जाळल्या आहेत. यामुळे राज्य सरकारांनी अग्निवीरांना चार वर्षांनी नोकऱ्यांत प्राधान्य देण्याच्या घोषणा करत तरुणांमधील राग शांत करण्याचा प्रयत्न केला.
परंतू, भाजपाने अग्निवीरांना आपल्याकडे नोकरी देण्याची घोषणा केली आहे. चार वर्षांनी पुढे काय? या प्रश्नावरून वातावरण तापलेले असताना भाजपाचे राष्ट्रीय महासचिव कैलास विजयवर्गीय यांनी भाजपा कार्यालयांमध्ये सुरक्षा रक्षक नेमायचे असतील तेव्हा चार वर्षांनी बाहेर पडणाऱ्या अग्निवीरांना नोकरीसाठी प्राधान्य देईन, अशी घोषणा केली आहे. इंदौरमध्ये त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
यावरून आता विजवर्गीय यांना विरोधकांनी घेरण्यास सुरुवात केली आहे. विजयवर्गीय यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काँग्रेससह राजकीय पक्षांनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून म्हटले की, देशातील तरुणांचा आणि सैन्याच्या जवानांचा एवढाही अपमान करू नका. ते शारीरिक चाचणी पास करण्यासाठी कठोर मेहनत घेतात. चाचण्या पास करतात. त्यांना आयुष्यभर देश सेवा करायची असते. त्यांना भाजपाच्या कार्यालयाबाहेर गार्ड म्हणून रहायचे नाहीय.
#WATCH | I will give preference to an Agniveer to hire him as security in BJP office, even you can...People have faith in armymen: BJP National General Secretary Kailash Vijayvargiya in Indore, Madhya Pradesh pic.twitter.com/6NQoXw2nFv
— ANI (@ANI) June 19, 2022
जे सैन्य दलात कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा विचार करीत आहेत, तेच एक दिवस देश कंत्राटी पद्धतीने चालवायला देतील, अशी टीका गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. भारतीय सैन्य दल सीमेवर अहोरात्र रक्षण करते म्हणून आपण येथे निश्चिंत आहोत. त्यांच्या भावनांची अशी थट्टा करू नका, असे आवाहनही आव्हाड यांनी सरकारला केले.