केंद्राच्या अग्निपथ योजनेवरून बिहारमधील वातावरण जबरदस्त तापले आहे. यामुळे नितीश कुमार यांचा जेडीयू आणि प्रमुख मित्रपक्ष असलेला भाजप यांच्यातील दुरावाही वाढताना दिसत आहे. दोन्ही पक्षांतील नेते राज्यातील सुशासनावरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. भाजप अध्यक्ष संजय कुमार जायसवाल यांच्यानंतर, नीतीश कॅबिनेट मधील मंत्री आणि भाजप नेते नीरज कुमार सिंह बबलू यांनीही जेडीयूच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एवढेच नाही, तर त्यांनी जेडीयू नेत्यांना युतीतून बाहेर पडण्याचेही आव्हान दिले आहे.
भाजपनं जेडीयूवर केले आहेत असे आरोप - बिहारमध्ये अग्निपथ योजनेच्या विरोधात झालेल्या हिंसक आंदोलनादरम्यान, भाजप नेत्यांच्या घरांनाही लक्ष्य करण्यात् आले होते. भाजपच्या अनेक नेत्यांच्या घरांवर आंदोलकांनी हल्ले केले. यानंतर केंद्राने भाजपच्या 10 नेत्यांना Y दर्जाची सुरक्षा दिली. भाजप अध्यक्ष संजयकुमार जायस्वाल यांनी निदर्शने आणि हिंसक घटनांसंदर्भात बोलताना, हे बिहार पोलिसांचे अपयश आहे, असे म्हटले होते.
जेडीयूचा भाजपवर पलटवार - संजय जायस्वाल यांच्या विधानानंतर दुसऱ्याच दिवशी जेडीयूचे प्रवक्ते आणि एमएलसी नीरज कुमार पलटवार करत म्हणाले होते, की यूपीमधील योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने अग्निपथ भरती योजनेला विरोध करणाऱ्या तरुणांवर बुलडोझर का चालवले नाही? अलिगडमध्ये पोलीस ठाणे पेटवणाऱ्या आंदोलकांवर कडक कारवाई का केली गेली नाही?
तसेच, रेल्वेच्या मालमत्तेचे संरक्षण करणे, ही प्रामुख्याने रेल्वे संरक्षण दलाची (आरपीएफ) जबाबदारी आहे, जे केंद्राच्या अखत्यारीत येते. आरपीएफने आंदोलनाच्या नावावर नष्ट करण्यात आलेल्या आणि लुटण्यात आलेल्या रेल्वेच्या संपत्तीचे संरक्षण करायला हवे होते. भाजपचे पदाधिकारी आरपीएफच्या अपयशासंदर्भात का बोलत नाहीत? असा प्रश्नही नीरज कुमार यांनी केला होता.
भाजप नेत्याचे जेडीयूला आव्हान -जेडीयू प्रवक्त्यांच्या नाराजीचा उल्लेख करत, भाजप नेते मंत्री बबलू म्हणाले, त्यांचे (जेडीयू नेते) पाय पकडून, त्यांना युतीत राहण्यासाठी कुणीही थांबवले नाही. जर काही लोकांनी कुठल्या ना कुठल्या बहान्याने एनडीएतून बाहेर जाण्याचे ठरवलेच असले, तर ते पुढे जाऊ शकतात. तसेच, भाजप प्रदेशाध्यक्षांनी पक्षातील नेत्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात पोलिसांच्या अपयशावर बोट ठेवले, तर त्यात चूक काय होते? असेही बबलू म्हणाले.