कोलकाता : अग्निवीर हे भाजप कार्यकर्ते असल्याचा खळबळजनक उल्लेख पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. या भाजप कार्यकर्त्यांना राज्यांनी नोकऱ्या का द्यायच्या असा सवाल ममता बॅनर्जी यांनी केला.
सेना दलांमध्ये अग्निवीरांची चार वर्षे सेवा पूर्ण झाल्यानंतर त्यांना राज्यांनी नोकऱ्या उपलब्ध करून द्याव्यात असे पत्र केंद्राने राज्यांना पाठविले होते. त्या अनुषंगाने ममता बॅनर्जी यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. त्या म्हणाल्या की भाजप कार्यकर्त्यांना आम्ही नोकऱ्या का द्यायच्या ? त्यापेक्षा आमच्या राज्यातील युवकांना नोकऱ्यांमध्ये राज्य सरकार प्राधान्य देईल.
त्यांनी म्हटले आहे की, सैन्यदलामध्ये केंद्र सरकार अग्निवीरांना फक्त चार वर्षे सेवा बजावण्याची संधी देणार आहे. त्यानंतर या अग्निवीरांना नोकऱ्या देण्याची जबाबदारी केंद्र सरकार राज्यांवर ढकलणार हे योग्य नाही. नोकरीची गरज असलेल्या युवकांची पश्चिम बंगालमध्ये कमतरता नाही. आम्ही या युवकांचा नोकऱ्यांसाठी प्राधान्याने विचार करू.
निवडणुकांपर्यंतच अग्निपथ योजना २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकांपर्यंतच अग्निपथ योजना केंद्र सरकारकडून राबविली जाईल असा दावा ममता बॅनर्जी यांनी केला. अग्निपथ योजना विरोधात देशभरात निदर्शने झाली होती. काही ठिकाणी या निदर्शनांना हिंसक वळण लागले होते. अग्निपथ योजनेबाबत विरोधकांनीही चिंता व्यक्त केली होती. मात्र अग्निवीरांनी चार वर्षे सेनादलात सेवा बजावल्यानंतर त्यांना नोकऱ्या देण्याची तयारी भाजपची सत्ता असलेल्या हरयाणा, उत्तर प्रदेश सारख्या राज्यांनी दाखविली आहे.