राजस्थानात भाजपा बॅकफूटवर?; फुटीच्या भीतीनं आमदार गुजरातेमध्ये हलवले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2020 02:26 AM2020-08-09T02:26:20+5:302020-08-09T06:50:51+5:30

राजकीय संकट; सरकार वाचविण्यासाठी अशोक गेहलोत प्रयत्नशील

Ahead of assembly session Rajasthan BJP MLAs shifted to Gujarats Porbandar | राजस्थानात भाजपा बॅकफूटवर?; फुटीच्या भीतीनं आमदार गुजरातेमध्ये हलवले

राजस्थानात भाजपा बॅकफूटवर?; फुटीच्या भीतीनं आमदार गुजरातेमध्ये हलवले

googlenewsNext

जयपूर : राजस्थान विधानसभेचे अधिवेशन तोंडावर आलेले असतानाच भाजपने आपले काही आमदार शेजारील गुजरात राज्यात हलविले आहेत. आपले आमदार फोडण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडून केला जाऊ शकतो, अशी शक्यता वाटल्याने भाजपने हे पाऊल उचलल्याचे सूत्रांनी सांगितले.

सचिन पायलट यांनी आपल्या समर्थक आमदारांसह काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यामुळे राजस्थानात राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेहलोत यांचे सरकार पाडण्यासाठी भाजप प्रयत्नशील असतानाच गेहलोत यांच्याकडूनही आपले सरकार वाचविण्याचे हरतऱ्हेचे प्रयत्न केले जात आहेत.

बसपाच्या सहा आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या काँग्रेस प्रवेशास राजस्थान उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून त्यावर ११ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.

हे आमदार अपात्र ठरल्यास भाजपचे आमदार फोडण्याचा प्रयत्न गेहलोत सरकारकडून केला जाऊ शकतो, अशी भीती भाजपला वाटत आहे. त्यामुळे आपले आमदार गुजरातेत हलविण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.

सूत्रांनी सांगितले की, उदयपूर येथील पाच भाजप आमदारांना गुजरातेत हलविण्यात आले आहे. त्यात सलुंबरचे आमदार अमृतलाल मीना, झाडोलचे आमदार बाबुलाल खराडी, मावळीचे आमदार धर्मनारायण जोशी, उदयपूर ग्रामीणचे आमदार फूलसिंग मीना आणि गोगुंडाचे आमदार प्रताप गामेटी यांचा समावेश आहे. ज्येष्ठ भाजप नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया यांना मात्र गुजरातला हलविण्यात आलेले नाही.

वसुंधरा राजे जयपुरात नसल्याने आश्चर्य
राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे दोन दिवसांपूर्वी ढोलपूरहून दिल्लीला गेल्या आहेत. त्यांनी वरिष्ठ भाजप नेत्यांच्या भेटी घेतल्याचे मानले जात आहे.

गेहलोत सरकार गंभीर राजकीय संकटात असताना वसुंधरा राजे यांची जयपुरातील अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे. गेल्या महिन्यांत वरिष्ठ भाजप नेत्यांनी जयपुरात बैठका घेतल्या, तेव्हाही वसुंधरा राजे अनुपस्थित होत्या.

१४ आॅगस्टपासून राजस्थान विधानसभेचे अधिवेशन सुरू होत आहे. अशोक गेहलोत यांनी आपल्या समर्थक आमदारांना जयपूरहून जैसलमेर जिल्ह्यातील सूर्यगढ हॉटेलात हलविले आहे.

Web Title: Ahead of assembly session Rajasthan BJP MLAs shifted to Gujarats Porbandar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.