नवी दिल्ली - एअर इंडियाच्या भोपाळ-मुंबई या विमानातील एका प्रवाशाच्या नाश्त्यामध्ये झुरळ आढळल्याची घटना दोन दिवसापूर्वी समोर आली होती. या घटनेची दखल एअर इंडियाने घेतली असून जाहीर माफी मागितली आहे. प्रवाशाला खाद्यपदार्थामध्ये झुरळ सापडल्यामुळे एअर इंडियाने याबाबत जाहीर माफी मागणार एक ट्वीट केलं आहे.
'भोपाळ- मुंबई विमान प्रवासादरम्यान प्रवाशांना आलेल्या वाईट अनुभवाबद्दल आम्ही क्षमस्व आहोत. प्रवाशांना प्रवासाचा आनंद मिळावा हाच आमचा सर्वतोपरी हेतू असतो', असं एअर इंडियाकडून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
एअर इंडियाच्या एआय-634 या विमानाने शनिवारी सकाळी भोपाळहून मुंबईसाठी उड्डाण केले. त्यावेळी विमानात प्रवाशांना नाश्ता देण्यात आला. रोहितराज सिंह चौहान या प्रवाशाला देण्यात आलेल्या नाश्त्यामध्ये एक मृत झुरळ आढळले. रोहितराज यांनी मुंबई विमानतळावर आल्यानंतर याबाबत तक्रार नोंदवली होती. तसेच ट्वीटरवरून माहिती दिली होती. या घटनेची तातडीने दखल घेत एअर इंडियाने याबाबत जाहीर माफी मागितली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे.