नवी दिल्ली : योग्य किंमत न आल्यास एअर इंडियाची विक्री सरकार करणार नाही, अशी माहिती उड्डयन मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. उड्डयन सचिव आर.एन. चौबे यांनी सांगितले की, एअर इंडियाची विक्री करण्याचा अथवा न करण्याचा हक्क सरकारने राखून ठेवला आहे. निविदांमधील किमती अपुºया असल्याचे आढळून आल्यास एअर इंडियाची विक्री न करण्याचा निर्णय सरकार घेऊ शकते.सूत्रांनी सांगितले की, यंदा डिसेंबर अखेरपर्यंत एअर इंडियाच्या खासगीकरणाची प्रक्रिया संपविण्याची केंद्राची योजना आहे. एअर इंडियाची किंमत ठरविण्यासाठी सरकारने सल्लागारांची नेमणूक केली आहे. कंपनीचे व्यावसायिक आणि सांपत्तिक मूल्य हे सल्लागार ठरवतील. मूल्यनिर्धारक एअरलाईनची आधार किंमत ठरवतील. निविदा सादर करणाºयांना आधार किमतीपेक्षा जास्त किंमत लावावी लागेल. खरेदीदार कंपन्यांनी आधार किमतीपेक्षा कमी किंमत लावलीच, तर सरकार कोणतीही निविदा न स्वीकारण्याचा निर्णय घेईल. कर्जबाजारी झालेल्या एअर इंडियामधील ७६ टक्के हिस्सेदारी विकण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ही कंपनी चालविणे सरकारसाठी डोकेदुखी ठरल्याने ती विकण्याचा निर्णय घेतला आहे.
योग्य किंमत न आल्यास एअर इंडियाची विक्री रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 12:06 AM