सिमकार्डाच्या ‘आधार’ जोडणीस एअरटेलला बंदी, अंतरिम आदेश जारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 12:39 AM2017-12-17T00:39:58+5:302017-12-17T00:40:19+5:30
मोबाइल फोन ग्राहकांच्या सिमकार्डाची ‘आधार’शी जोडणी करण्यासाठी ई-केवायसी प्रणालीचा वापर करण्यास ‘युनिक आयडेन्टिटी अॅथॉरिटी आॅफ इंडिया’ (यूआयडीएआय) भारती एअरटेल आणि एअरटेल पेमेंट बँकेस तात्पुरती बंदी केली आहे.
नवी दिल्ली : मोबाइल फोन ग्राहकांच्या सिमकार्डाची ‘आधार’शी जोडणी करण्यासाठी ई-केवायसी प्रणालीचा वापर करण्यास ‘युनिक आयडेन्टिटी अॅथॉरिटी आॅफ इंडिया’ (यूआयडीएआय) भारती एअरटेल आणि एअरटेल पेमेंट बँकेस तात्पुरती बंदी केली आहे.
‘यूआयडीएआय’ हे नागरिकांना ‘आधार’ कार्ड जारी करणारे प्राधिकरण आहे. एअरटेलच्या मोबाइल फोनधारकाने त्याचे सिमकार्ड ‘आधार’शी जोडून घेतले की त्याच डेटाचा वापर करून एअरटेल बँकेत त्याचे खाते नको असताना उघडले जाते आणि त्या ग्राहकास मिळणारे स्वयंपाकाच्या गॅसचे अनुदानही परस्पर त्या खात्यात वळते होते, अशा असंख्य तक्रारी आल्यानंतर प्राधिकरणाने हा अंतरिम मनाई आदेश जारी केला आहे. सिमकार्डांची ‘आधार’शी जोडणी सक्तीची केल्यापासून त्या प्रक्रियेचा दुरुपयोग केल्याबद्दल कोणाही मोबाइल फोन कंपनीविरुद्ध असा आदेश काढला जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.
आत्तापर्यंत सिमकार्डाची ‘आधार’शी जोडणी केलेल्या एअरटेलच्या सुमारे २३ लाख ग्राहकांची खाती एअरटेल बँकेत उघडली गेली असून त्यात गॅसच्या अनुदानाचे सुमारे ४७ कोटी रुपये परस्पर जमा झाले आहेत, अशी ढोबळ आकडेवारी उपलब्ध आहे. माहीतगार सूत्रांनुसार या अंतरिम आदेशाने प्राधिकरणाने भारती एअरटेल आणि एअरटेल पेमेंट बँक यांचे ई-केवायसी परवाने तूर्तास निलंबित केले आहेत. परिणामी हा आदेश लागू असेपर्यंत एअरटेल त्यांच्या ग्राहकांच्या सिमकार्डाच्या ‘ई व्हेरिफिकेशन’साठी ‘आधार’ कार्डाचा आणि त्याच्याशी संबंधित यंत्रणेचा वापर करू शकणार नाही. तसेच सिम व्हेरिफिकेशनसाठी प्राप्त झालेल्या ‘आधार’च्या माहितीचा उपयोग करून एअरटेल पेमेंट बँक त्या ग्राहकाचे त्याच्या संमतीविना खातेही उघडू शकणार नाही. प्राधिकरणाने असा आदेश दिला आहे यास भारती एअरटेलच्या प्रवक्त्याने दुजोरा दिला व यातून लवकरात लवकर मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे आश्वासन दिले. दरम्यानच्या काळात ग्राहकांच्या होणाºया गैरसोयीबद्दल प्रवक्त्याने दिलगिरीही व्यक्त केली.
पहिली तक्रार जोग यांची
मुंबईत गिरगाव येथे राहणारे गोपाळ महादेव जोग यांना एअरटेलचा हा अनुभव १५ जून रोजी आल्यावर त्यांनी यासंदर्भात सर्वप्रथम तक्रार केली. त्यांनी पंतप्रधान कार्यालय व रिझर्व्ह बँकेकडेही गाºहाणे मांडले. एअरटेल बँक आमच्या अकत्यारीत येत नाही, असे सांगून रिझर्व्ह बँकेने हात वर केले.
- जोग यांचे खाते बंद करण्यात आले आहे, असे एअरटेल पेमेंट बँकेने कळविल्याने पंतप्रधान कार्यालयाने त्यांची तक्रार निकाली काढली. प्रत्यक्षात एअरटेल बँकेने पंतप्रधान कार्यालयाची दिशाभूल केल्याचे निष्पन्न झाले.
- कारण त्यांचे बँक खाते अद्यापही बंद झालेले नाही व हयात नसलेल्या वडिलांच्या नावाची खात्यात ‘नॉमिनी’ म्हणून नोंद केल्याचे किंवा ‘तुमचे प्रोफाईल अपडेट करण्यात आले आहे’ असे एसएमएस त्यांना एअरटेल पेमेंट बँकेकडून अजूनही येत आहेत.