हवाई वाहतूक नियंत्रक व विमान देखभाल करणाऱ्यांची मद्यचाचणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2019 03:48 AM2019-08-09T03:48:53+5:302019-08-09T03:49:14+5:30
डीजीसीएचा प्रस्ताव, विमान प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी उपाययोजना
मुंबई : विमान सेवा अधिक सुरक्षित करण्यासाठी नागरी हवाई वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए)ने प्रतिबंधात्मक पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून विमानसेवेशी संबंधित हवाई वाहतूक नियंत्रक, विमान देखभाल करणारे कर्मचारी, विमानतळावरील वाहनांचे चालक, विमानतळावरील अग्निशमन दलातील कर्मचारी, ग्राऊंड स्टाफ यांच्या मद्यचाचणीचा प्रस्ताव तयार केला आहे. चाचणीत मद्याचा अंश सापडल्यास निलंबनाची कारवाई प्रस्तावित आहे.
सध्या केवळ वैमानिक, केबिन क्रू यांची कामावर रुजू होण्यापूर्वी मद्य चाचणी (ब्रेथ अॅनालायझर - बीए) केली जाते. मात्र प्रत्यक्ष विमान चालवणाऱ्यांसोबत विमानाची देखभाल करणाºया व विमानाला मार्ग दाखवणाºया हवाई वाहतूक नियंत्रकांचीदेखील मद्य चाचणी करण्याची मागणी केली जात होती. त्यावर हा निर्णय घेण्यात आला आहे.
चाचणीचे निकाल वर्षभरासाठी सांभाळून ठेवावेत असे प्रस्तावात नमूद आहे. किमान १० टक्के कर्मचाºयांची चाचणी दररोज करावी व चाचणीसाठी कर्मचाºयांची निवड अचानक करावी असे सुचविले आहे. पहिल्या चाचणीत मद्य आढळल्यास हवाई वाहतूक नियंत्रकांचा परवाना ३ महिने रद्द करावा, त्यांना ड्युटीवरून बाजूला करावे, दुसºया चाचणीत मद्याचा अंश आढळल्यास परवाना १ वर्षासाठी रद्द करावा तर तिसºया चाचणीत मद्याचा अंश सापडल्यास परवाना ३ वर्षांसाठी रद्द करण्याचे प्रस्तावित आहे.
विमानतळावरील इतर कर्मचाºयांच्या चाचणीत पहिल्या वेळी मद्याचा अंश सापडल्यास त्यांना काही काळ बडतर्फ करावे, दुसºयांदा मद्याचा अंश सापडल्यास कायमस्वरूपी कामावरून काढून टाकावे, याबाबत स्थानिक आॅपरेटरने निर्णय घ्यावा, अशी शिफारस करण्यात आली आहे.