ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 - फेसबूक आणि ई-मेल नंतर हॅकर्सनी आपला मोर्चा आता व्हॉट्सअॅपकडे वळवला आहे. देशभरात एक करप्रणाली म्हणजे जीएसटी 1 जुलैपासून लागू झाली आहे. जीएसटी लागू होण्यापूर्वी अनेक कंपन्यांनी प्री-जीएसटी ऑफर्स दिल्या होत्या. अनेक मोबाईल्स, इलोक्ट्रॉनिक गॅझेट व अन्य प्रोडक्ट्सवरही मोठ्या प्रमाणात सूट देण्यात आली होती. याच दरम्यान जीएसटी ऑफर्सचे अनेक खोटे व्हॉट्सअॅप मेसेजही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. स्वस्तात अनेक प्रोडक्ट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा अशाप्रकारचे मेसेज सर्रास फिरत आहेत. मात्र, अशा मेसेजचं सत्य काही वेगळं असतं. तुमची फसवणूक करणं हा एकमेव उद्देश या मेसेजेसमागे असतो. तुम्ही एकदा का त्या लिंकवर क्लिक केलं किंवा लिंकवर सांगितल्याप्रमाणे माहिती दिली की तुमचं अकाउंट हॅक झालंच समजा. विविध वेबसाईट्सवर तुम्ही दिलेली तुमची सर्व खासगी माहिती याद्वारे हॅकरला मिळते. यामध्ये तुमच्या बॅंक अकाउंट, एटीएम पीन आदी गोष्टींचाही समावेश असतो.
सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होणा-या मेसेजपैकी एका मेसेजमध्ये केवळ 1099 रूपयांमध्ये Redmi Note 4 खरेदी करता येण्याचा दावा करण्यात आला आहे. इ-कॉमर्स वेबसाइट अॅमेझॉनवर Redmi Note 4 केवळ 1099 रूपयांमध्ये मिळत असल्याचं या मेसेजमध्ये म्हटलं आहे. या मेसेजनुसार 32 GB Note 4 1099 रूपयांमध्ये आणि 64 GB Note 4 1299 रुपयांत मिळणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. या मेसेजसोबत एक लिंक देखील शेअर केली जात आहे. या लिंकवर क्लिक केल्यास अॅमेझॉनच्या जीएसटी सेलचं एक पेज ओपन होतं. याठिकाणी युजरला आपलं पूर्ण नाव, इमेल आयडी, मोबाइल नंबर आणि पत्ता अशी खासगी माहिती मागितली जाते. याशिवाय स्मार्टफोनचं बुकींग कन्फर्म करण्यासाठी आठ वेगवेगळ्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये मेसेज फॉरवर्ड करावा असं सांगितलं जातं.
तुम्ही एकदा हा मेसेज शेअर केला की तुम्हाला एक ऑर्डर नंबर मिळतो. तसंच बॅकग्राउंडमध्ये UC न्यूजचं एक अॅप डाउनलोड होण्यास सुरूवात होते. यानंतर तुम्हाला एक मेसेज मिळतो ज्यामध्ये तुमची ऑर्डर पूर्ण झाली असून एका आठवड्यापर्यंत UC न्यूज अॅप अनइन्स्टॉल न करण्यास सांगितलं जातं.
अशाप्रकारचे मेसेज हे केवळ तुमची फसवणूक करण्यासाठी असतात. अशा मेसेजद्वारे हॅकर तुमची खासगी माहिती चोरी करून त्याचा गैरवापर करू शकतात व त्यामुळे तुम्ही अडचणीत येण्याची शक्यता असते. त्यामुळे जर तुमच्या व्हॉट्सअॅपवरही अशाप्रकारचा कोणता मेसेज आला असेल तर तो फॉरवर्ड करू नका तसंच त्यासोबत दिलेल्या लिंकवरही क्लिक करू नका.