जयललिता हॉस्पिटलमध्ये असताना सर्व सीसीटीव्ही बंद होते- अपोलो हॉस्पिटल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2018 06:06 PM2018-03-22T18:06:07+5:302018-03-22T18:06:07+5:30
हॉस्पिटलमधील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे 75 दिवस बंद होते.
चेन्नई- तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता अपोलो हॉस्पिटलमध्ये 75 दिवस उपचार घेत होत्या. त्यादरम्यान हॉस्पिटलमधील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे 75 दिवस बंद होते, अशी माहिती अपोलो हॉस्पिटलचे चेअरमन डॉ.प्रताप सी रेड्डी यांनी दिली आहे. 'अपोलो इंटरनॅशनल कोलोरेक्टल सिम्पोजियम २०१८च्या पत्रकार परिषदेत रेड्डी यांनी जयललिता यांच्याबाबत माहिती दिली. जयललिता यांच्या मृत्यूची चौकशी करत असलेल्या न्यायमूर्ती ए. अरुमुगस्वामी आयोगाकडे सर्व संबधित दस्तावेज सोपवण्यात आले आहेत, असं त्यांनी नमूद केलं.
जयललिता 75 दिवस हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना तेव्हाचं सीसीटीव्ही फुटेज आयोगाकडे पाठविण्यात आलं का? असा सवाल विचारण्यात आला. त्यावेळी असं कुठलंही फुटेज आमच्याकडे नाही, जयललिता हॉस्पिटलमध्ये असताना 75 दिवस सीसीटीव्ही कॅमेरे बंद ठेवण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीबद्दलच्या माहितीसंदर्भात प्रचंड गोपनियता बाळगता यावी म्हणून आम्ही तो निर्णय घेतला.जयललिता यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आल्यानंतर तेथील इतर रूग्णांना दुसऱ्या अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं. आयसीयूमधील २४ पैकी एकाच रूमचा वापर करण्यात येत होता. या 'आयसीयू'त प्रवेशही मर्यादित ठेवण्यात आला होता. जवळच्या नातेवाईकांना त्यांच्या तब्येतीबाबत ताजी माहिती देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. शिवाय ड्युटीवर असणारे डॉक्टर ठराविक वेळेत नातेवाईकांना आयसीयूमध्ये जाण्याची परवानगी देत होते, अशी माहिती डॉ.प्रताप सी रेड्डी यांनी दिली.
जयललिता यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊन त्या पूर्णपणे बऱ्या व्हाव्यात यासाठी हॉस्पिटलने पूर्ण प्रयत्न केले. पण जयललिता यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने आमचे प्रयत्न व्यर्थ ठरले, असे रेड्डी यांनी सांगितलं. आयोगाच्या तपासास आम्ही पूर्ण सहकार्य करत आहोत. जेव्हा कधी आम्हाला प्रत्यक्ष बालावले जाईल तेव्हा आम्ही आयोगापुढे हजर राहू, असंही त्यांनी स्पष्ट केलं.