सर्व एक्झिट पोलचा भाजपाकडे कल! वाचा गुजरात विधानसभेच्या सर्व Exit Poll ची आकडेवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2017 08:12 PM2017-12-14T20:12:15+5:302017-12-14T20:38:33+5:30
सत्ताधारी भाजपा आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर झाल्याने गुजरात विधानसभा निवडणुकीत धक्कादायक निकाल लागण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती.
नवी दिल्ली - सत्ताधारी भाजपा आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर झाल्याने गुजरात विधानसभा निवडणुकीत धक्कादायक निकाल लागण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र दुसऱ्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर आलेल्या एक्झिट पोलमधून गुजरातमधील मतदानाचा कल भाजपाच्या दिशेने असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गुजरातमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळणार असून भाजपाला किमान 100 हून अधिक जागा मिळतील, असे सर्वच एक्झिच पोलनी म्हटले आहे.
नेहमीच धक्कादायक आणि अचूक अंदाज वर्तवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या न्यूज 24 टुडेज चाणक्यने भाजपाला 135 जागा ( 11 जागा कमी किंवा जास्त) कॉंग्रेसला 47 जागा ( 11 जागा कमी किंवा जास्त) आणि इतरांना 0 ते 3 जागांची शक्यता वर्तवली आहे.
इंडिया टुडे समूह आणि अॅक्सिस माय इंडियाने केलेल्या सर्वेक्षणातून भाजपला गुजरातमध्ये 99-113 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काँग्रेसला 68-82 जागा मिळतील असा अंदाज सर्वेक्षणातून समोर आलं आहे. 2012 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला 116 आणि काँग्रेसला 60 जागा जिंकण्यात यश आले होते.
टाइम्स नाऊ-व्हीएमआर यांनी संयुक्तरीत्या घेतलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपाला बहुमत मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या एक्झिट पोलमध्ये भाजपाला 182 जागांपैकी 109 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर काँग्रेसला 70 जागांवर समाधान मानावं लागण्याची शक्यता आहे. तर इतरांना 3 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
एबीपी न्यूज-सीएसडीएसच्या एक्झिट पोलमध्ये भाजपाच सत्तेत पुनरागमन करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गुजरातमध्ये भाजपाला 49 टक्के मतांसह 117 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, काँग्रेसला केवळ 64 जागांवर समाधान मानावे लागणार आहे, असे या एक्झिट पोलमध्ये म्हटले आहे. तर इतरांच्या खात्यामध्ये केवळ एक जागा जाण्याची शक्यता आहे.
इतर एक्झिट पोलमध्ये सुद्धा असाच कयास वर्तवण्यात आला आहे. या सर्व पोलचा आढावा घेतल्यास भाजपाला साधारणत: 49 टक्के मते आणि 123 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.