अहमदाबाद : गोएअरचे विमान अहमदाबादहून जयपूरला निघणार होते. प्रवासी विमानात बसू लागले होते. काही प्रवासी विमानाच्या वरील बाजूच्या कप्प्यात आपले सामान ठेवत होते. बॅग ठेवण्यासाठी एका प्रवाशाने वरील कप्पा उघडला आणि त्यातून चक्क कबुतर बाहेर पडले.कबुतर पाहून प्रवाशांनी आरडाओरडा सुरू केला. अनेक जण घाबरले. या गोंधळामुळे बाहेर पडण्याचा मार्ग कबुतराला सापडेना. तितक्यात काही प्रवाशांनी मोबाइलवर कबुतराचे फोटो काढायला, चित्रीकरण करायला सुरुवात केली.विमानाची दारे उघडी असताना कबुतर आत शिरले असावे, पण ते बंद कप्प्यांच्या आत कसे शिरले, हा प्रश्न आहे. मात्र, काही वेळाने गोएअरच्या कर्मचाऱ्यांनी विमानाचे दार उघडून कबुतराला बाहेर काढले आणि त्याने कबुतरानेही विमानाआधीच आकाशात झेप घेतली. आता या प्रकाराची चौकशी होणार आहे. (वृत्तसंस्था)
विमानात शिरलेले कबुतर पाहून सारेच प्रवासी भांबावले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2020 3:56 AM