नवी दिल्ली - पेट्रोल आणि डिझेलचे दर दोन वर्षांतील उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. सोमवारीही तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे २८ आणि २९ पैसे प्रतिलिटर वाढविले आहेत. त्यामुळे अनेक शहरांमध्ये पेट्रोलचे दर पुन्हा एकदा नव्वदी पार गेले आहेत. पेट्रोलचे दर 90 पार केल्यानंतर देशातील सर्वसामान्य नागरिकांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे. याच दरम्यान काँग्रेसच्या एका नेत्याने मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
देशातील पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीवरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत सणसणीत टोला लगावला आहे. "देशातील सर्व पेट्रोल पंपांचं नाव बदलून 'नरेंद्र मोदी वसुली केंद्र' करा" असं म्हटलं आहे. काँग्रेस नेते श्रीवत्स यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "पेट्रोल दर : ९० रुपये, वास्तव किंमत : ३० रुपये, मोदी टॅक्स : ६० रुपये असं म्हणत देशातील सर्व पेट्रोल पंपांची नाव बदलून 'नरेंद्र मोदी वसुली केंद्र' करण्यात यावं" असं श्रीवत्स यांनी म्हटलं आहे.
भाजपा नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामींनी पेट्रोलचे दर ४० रुपये प्रति लिटर असायला हवेत, असं स्पष्ट गणितच मांडलं आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती दिली, पेट्रोलचे दर देशात ९० रुपये प्रति लिटर झाले असून ती देशातील सर्वसामान्य नागरिकांची मोठी पिळवणूक असल्याचं स्वामींनी म्हटलंय. पेट्रोलच एक्स रिफायनरी मूळ किंमत ३० रुपये प्रति लिटर एवढी आहे. मात्र, सर्व प्रकारचे टॅक्स आणि पेट्रोल पंपाचे कमिशन मिळून ही किंमत ६०रुपयांनी वाढते. त्यामुळे, पेट्रोलचे प्रति लिटर दर ९० रुपये एवढे आहेत. माझ्या मते पेट्रोलच जास्तीत जास्त किंमत ४० रुपये प्रति लिटर असणे आवश्यक आहे, असेही स्वामींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन म्हटलं आहे.
दरम्यान, लॉकडाऊनच्या कालावधीत सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले होते. त्यानंतर १ जूनपासून दरवाढीस सुरूवात केली होती. सरकारने २२ सप्टेंबरपासून पुन्हा दरवाढीला ब्रेक लावला होता. २० नोव्हेंबरला पुन्हा दरवाढ केली होती. गेल्या १७ दिवसांमध्ये पेट्रोलचे दर २.३५ रुपयांनी तर डिझेलचे दर ३.१५ रुपयांनी वाढले आहेत.
उत्पादन शुल्कात मोठी वाढ
केंद्र सरकारकडून सध्या पेट्रोलवर ३२.९८ रुपये तर डिझेलवर ३१.८३ रुपये उत्पादन शुल्क आकारण्यात येते. तर महाराष्ट्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलवर अनुक्रमे २६ आणि २४ टक्के व्हॅट आकारला जातो. त्यावर अनुक्रमे १०.२० रुपये आणि ३ रुपये सेसही घेण्यात येतो.