निर्भयाच्या दोषींना फाशी देण्याची सर्व तयारी केली होती!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 04:17 AM2020-03-04T04:17:13+5:302020-03-04T07:35:05+5:30
निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या खटल्यातील चार दोषींना फासावर लटकाविण्यासाठी सर्व आवश्यक तयारी केली होती,
नवी दिल्ली : निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या खटल्यातील चार दोषींना फासावर लटकाविण्यासाठी सर्व आवश्यक तयारी केली होती, असे तिहार तुरुंगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मंगळवारी सकाळी ६ वाजता त्यांना फाशी देण्यात येणार होती. तथापि, सोमवारी सायंकाळी एका कोर्टाने पुढील आदेशापर्यंत फाशीला स्थगिती दिली.
राष्ट्रपतींकडे प्रलंबित असलेली दोषी पवन गुप्ता दयायाचिका निकाली काढल्याशिवाय दोषींना फाशी देता येऊ शकत नाही, असे स्पष्ट करीत अतिरिक्त सत्र न्यायाधीश धमेंद्र राणा यांनी फाशीला स्थगिती दिली होती. कोणत्याही दोषीच्या मनात आपल्या सृष्टीकर्त्याची भेट घेतेवेळी कोर्टाने त्याला कायदेशीर उपायाचा वापर करण्यास परवानगी देण्याबाबत निष्पक्षपणे काम केले नाही, अशी तक्रार राहता कामा नये, असे न्यायाधीश म्हणाले होते.
आम्ही या चार दोषींना फासावर लटकाविण्यासाठी सर्व आवश्यक तयारी केली होती. फाशी स्थगित करण्यात आल्याने आम्ही कोर्टाच्या पुढील आदेशाच्या प्रतीक्षेत आहोत, असे वरिष्ठ तुरुंग अधिकाºयाने सांगितले. तिहार तुरुंगात असलेले दोषी मुकेश कुमार सिंह, विनय कुमार शर्मा, अक्षय कुमार सिंह आणि पवन गुप्ता यांना ३ मार्च रोजी फाशी देण्यात येणार होती.
>रंगीत तालीमही झाली
फाशीसाठी तयार करण्यात आलेल्या दोरखंडाची आम्ही बारकाईने तपासणी केली होती. वधकारीला बोलावून दोषींची उंची आणि वजनानुसार तयार करण्यात आलेल्या प्रतिरूपी पुतळ्यांना फाशीची रंगीत तालीमही करण्यात आली होती.
मेरठहून बोलाविण्यात आलेला वधकारी मंगळवारी दुपारी राष्ट्रीय राजधानी सोडणार आहे, असे एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.