कम्युनिस्टांच्या स्वभावामध्येच हिंसेचे राजकारण, भाजपाचे अध्यक्ष अमित शहांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 12:39 AM2017-10-09T00:39:37+5:302017-10-09T00:39:45+5:30
‘हिंसेचे राजकारण’ कम्युनिस्टांच्या स्वभावातच आहे, असा आरोप भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी केला.
नवी दिल्ली : ‘हिंसेचे राजकारण’ कम्युनिस्टांच्या स्वभावातच आहे, असा आरोप भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी केला. केरळमध्ये होत असलेल्या राजकीय हत्यांच्या प्रश्नावर शहा यांनी माकपच्या येथील कार्यालयावर मोर्चा नेला होता. त्या वेळी ते बोलत होते.
केरळमध्ये डाव्या पक्षांच्या अत्याचारांच्या विरोधात शाह यांनी ‘जनरक्षा यात्रा’ मोहीम हाती घेतली आहे. शाह म्हणाले की, केरळमध्ये भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांना डाव्या पक्षाचे कार्यकर्ते ठार मारत आहेत व दहशत निर्माण करीत आहेत. शहा यांनी कॅनॉट प्लेसमधून गोल मार्केट भागातील माकपच्या मुख्यालयावर मोर्चा नेला. या वेळी दिल्ली भाजपाचे अध्यक्ष मनोज तिवारी, केंद्रीय मंत्री अल्फोन्स कन्नानथानाम आणि भाजपाचे दिल्लीतील खासदार उपस्थित होते. शहा म्हणाले, कितीही दहशत निर्माण केली, तरी डाव्यांची सत्ता असलेल्या केरळमध्ये कमळ फुलायचे कोणीही थांबवू शकत नाही. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या स्वत:च्या जिल्ह्यात भाजपा आणि संघाच्या जास्तीतजास्त कार्यकर्त्यांच्या अत्यंत क्रूररीत्या हत्या झाल्या आहेत, असा आरोप शहा यांनी केला. हत्यांचा संपूर्ण दोष विजयन यांचाच असल्याचे ते म्हणाले. हिंसेचे राजकारण हा कम्युनिस्टांचा स्वभाव आहे. केरळ, पश्चिम बंगाल, त्रिपुरा राज्यात प्रदीर्घ काळापासून कम्युनिस्ट सत्तेवर असून, जास्तीतजास्त राजकीय हिंसाचार हा या राज्यांत झाला आहे, हा काही योगायोग नाही. हे लोक जेथे कुठे सत्तेवर असतात, तेथील राजकीय संस्कृती हिंसाचारात रूपांतरित होते, असे ते म्हणाले. जनरक्षा यात्रा शहा यांनी केरळमधील कन्नूर जिल्ह्यात ३ आॅक्टोबर रोजी सुरू केली. तिची सांगता १७ आॅक्टोबर रोजी थिरुवनंतपूरममध्ये होईल.
माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी लगेचच घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपाची ही यात्रा ‘फ्लॉप शो’ असल्याचा दावा केला.