सीव्हीसीसमोर वर्मा आज उपस्थित राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2018 05:34 AM2018-11-05T05:34:08+5:302018-11-05T05:34:27+5:30
केंद्रीय गुप्तचर खात्याचे सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलेले संचालक आलोक वर्मा हे तीन सदस्यीय केंद्रीय दक्षता आयोगापुढे (सीव्हीसी) सोमवारी हजर राहणार आहेत.
- हरीश गुप्ता
नवी दिल्ली - केंद्रीय गुप्तचर खात्याचे सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलेले संचालक आलोक वर्मा हे तीन सदस्यीय केंद्रीय दक्षता आयोगापुढे (सीव्हीसी) सोमवारी हजर राहणार आहेत. प्रशासकीय गैरवर्तन करणे, लालूप्रसाद यादव यांना रेल्वेच्या पाटण्यातील जमिनीचा फायदा होण्याच्या प्रकरणासह संवेदनशील प्रकरणांच्या तपासात विलंब करण्याचा आरोप वर्मा यांच्यावर असून, त्याच्या चौकशीसाठी सीव्हीसीने त्यांना बोलावले आहे. सर्वोच्च न्यायालयाने २६ आॅक्टोबर रोजी दिलेल्या आदेशानुसार सीव्हीसी ही चौकशी करीत आहे. या चौकशीवर सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती ए.के. पटनाईक यांची देखरेख असेल.
राकेश अस्थाना यांनी वर्मा यांच्यावर केलेल्या ९ आरोपांशी संबंधित दस्तावेजांच्या छाननीसाठी पटनाईक सीव्हीसीच्या कार्यालयाला नियमितपणे भेट देत आहेत, हे विशेष. आणखी विशेष म्हणजे अस्थाना यांच्यावर लाचखोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्याकडील अधिकार काढून घेण्यात आले आहेत. फक्त १४ दिवसांत वर्मा यांची चौकशी पूर्ण करण्याची जबाबदारी सीव्हीसीवर आहे.