संतोष ठाकूरनवी दिल्ली : सीएसडीएसच्या पाहणीनंतर भाजपाने कार्यकर्त्यांना तुम्ही त्याचे दडपण घेऊ नका आणि मतदारांनाही प्रभावीत होऊ देऊ नका, असा सल्ला दिला आहे. ही पाहणी चुकीचे असल्याचे सिद्ध होईल. आमचे कार्यकर्ते त्यांच्यासोबत फक्त दोन मते जरी घेऊन आले, तरी भाजपाचा विजयी घोडा कोणीही अडवू शकत नाही. ही दोन मते कार्यकर्त्याच्या कुटुंबातीलदेखील असू शकतात. त्यामुळे काळजीचे कारण नाही, असे भाजपाचे म्हणणे आहे.एक नेता म्हणाला की, राज्यात ४.३३ कोटी मतदार आहेत. त्यातील ७० टक्के मतदार मत देतात. त्यामुळे २ कोटी ८० लाख मतदार मतदान करतील. भाजपाला त्यातील निम्मी मते मिळविणे आमच्यासाठी अवघड नाही. म्हणूनच काळजी न करता प्रचार करा, असे आम्ही कार्यकर्त्यांना सांगितले आहे.गुजरातचा एक खासदार म्हणाला की, राज्यात आमच्याकडे सव्वा कोटी असे लोक आहेत की, ज्यांनी मिसकॉलद्वारे भाजपाशी नाते जोडले आहे. त्यातील ६० लाख भाजपाचे कार्यकर्ते आहेत. आमचा एक कार्यकर्ता फक्त दोन जणांना मतदानासाठी घेऊ न आला तरी पुरे. आमचे कार्यकर्ते ५-१० वा त्यापेक्षाही जास्त लोकांना घेऊन येण्यास सक्षम आहेत. जर ६० लाख कार्यकर्त्यांनी हे केले, तर आम्हाला एकूण मतदानाच्या ५० टक्क्यांहून अधिक म्हणजे सुमारे एक कोटी ८० लाख मते भाजपाला मिळतील.भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनीदेखील हे गणित अनेक वेळा कार्यकर्त्यांना सांगितले आहे. ते आम्ही पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना सांगितले आहे. एका कार्यकर्त्याने दोन मतदार आणले की आमचा विजय झालाच समजा.
स्वत:सोबत तुम्ही केवळ दोन मते आणा, विजय आपलाच; भाजपा नेत्यांचा कार्यकर्त्यांना सल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2017 3:38 AM