अमरनाथ हल्ला: पहिली घोडचूक, भाविकांच्या बसचं रजिस्ट्रेशन नव्हतं
By admin | Published: July 10, 2017 10:59 PM2017-07-10T22:59:45+5:302017-07-10T23:03:33+5:30
जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर दहशतवादी हल्ला झाल आहे. या हल्ल्यात आतापर्यंत 7 भाविकांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
अनंतनाग, दि. 10 - जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर दहशतवादी हल्ला झाल आहे. या हल्ल्यात आतापर्यंत 7 भाविकांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. तसंच 13 जण जखमी झाले आहेत. गुप्तचर यंत्रणांनी अमरनाथ यात्रेच्या आधी 25 जून रोजी दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट पोलीस प्रशासनाला दिला होता. याशिवाय एक मोठी घोडचूक समोर आली आहे. गुजरातच्या ज्या बसवर दहशतवादी हल्ला झाला त्या बसची नोंदणी श्राइन बोर्डाकडे करण्यात आली नव्हती अशी माहिती समोर आली आहे.
29 जूनपासून अमरनाथ यात्रा सुरू झाली. यात्रा सुरू होण्यापूर्वीच गुप्तचर यंत्रणांनी 25 जून रोजी दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट पोलीस प्रशासनाला दिला होता.अमरनाथ यात्रेवर हल्ला करून देशभरात सांप्रदायिक तणाव वाढवण्याचा प्रयत्न दहशतवादी करू शकतात. तसंच पोलीस आणि अमरनाथ यात्रेकरूंना लक्ष्य केलं जाऊ शकतं अशी माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती. त्यानंतर लगेचच गुप्तचर यंत्रणांनी तसा अलर्ट जारी केला होता.
अमरनाथ यात्रेवर यंदा दहशतवादी हल्ल्याचा इशारा देण्यात आला होता. सुरक्षा व्यवस्थेची दक्षता घेण्यात आली असून भाविकांच्या केसालाही धक्का लागणार नाही असा दावा सुरक्षा यंत्रणांनी केला होता. मात्र त्यानंतरही हा हल्ला झाल्याने सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत.
दहशतवाद्यांनी हा हल्ला रात्री 8 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास केला असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे. दरम्यान, जखमींना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, दुसरीकडे याच जिल्ह्यातील बांतिगू परिसरात पोलिसांच्या पथकावर सुद्धा दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला आहे. यात तीन जवान जखमी झाल्याचे समजते. दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर जम्मू- श्रीनगर महामार्गावरील वाहतूक थांबविण्यात आल्यामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत.
यापुर्वी 27 जुलै 2000 रोजी अमरनाथ यात्रेवर हल्ला झाला होता. त्यामध्ये 25 यात्रेकरूंचा मृत्यू झाला होता तर 37 यात्रेकरू जखमी झाले होते.