ऑनलाइन लोकमत
जम्मू-काश्मीर, दि. 10 - जम्मू-काश्मीरमध्ये अशांतता माजवणाऱ्या दहशतवाद्यांनी आज अमरनाथ यात्रेकरूंना आपले लक्ष्य केले. दहशतवाद्यांनी अनंतनाग जिल्ह्यात अमरनाथ यात्रेकरुंवर केलेल्या हल्ल्यात सात भाविकांचा मृत्यू झाला असून, १३ जण जखमी झाले आहेत. मृत यात्रेकरू हे गुजरातमधील वलसाड येथील राहणारे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बालटाल येथून जम्मूच्या दिशेने जाणाऱ्या अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात सात भाविक ठार झाले असून, १३ जण जखमी झाले आहे. दहशतवाद्यांनी रात्री आठच्या सुमारास हा हल्ला केला. यात्रेकरूंनी बस थांबवल्याने ही बस सुरक्षारक्षकांच्या ताफ्यातून मागे राहिली. ही संधी साधत दहशतवाद्यांनी हल्ला केला. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून, दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. दरम्यान, जखमींना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर जम्मू- श्रीनगर महामार्गावरील वाहतूक थांबविण्यात आल्यामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. भारतातील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांपैकी एक असलेल्या अमरनाथ येथील यात्रेला २९ जूनपासून सुरुवात झाली होती.
UPDATE: 7 #Amarnath yatris killed as militants open fire in #Anantnag in #Kashmir, say police.— Press Trust of India (@PTI_News) July 10, 2017
6 #Amarnath yatris killed as militants open fire in #Anantnag in #Kashmir: Sources.— Press Trust of India (@PTI_News) July 10, 2017
#FLASH: 2 Amarnath yatra pilgrims killed, many injured after terrorists attacked their bus in Batingu area of J&K"s Anantnag.Details awaited pic.twitter.com/pPQSGEzeW8— ANI (@ANI_news) July 10, 2017
दरम्यान, हल्ल्याची शिकार झालेली बस गुजरातमधील वलसाड येथील असल्याचे समोर आले आहे. तसेच मृतांमध्ये पाच महिलांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जम्मू आणि काश्मीरमधील इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री आणि राज्यपालांशी चर्चा केली आहे. तसेच या हल्ल्यानंतरही अमरनाथ यात्रा सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच या घटनेची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आली आहे.