नवी दिल्ली - अॅमेझॉन या ई-कॉमर्स वेबसाईटने हिंदू धर्माच्या देवदेवतांचा अनादर केला आहे. अॅमेझॉनवरहिंदू देवतांचे चित्र असलेल्या टॉयलेट सीट आणि डोअर मॅटची विक्री करण्यात येत आहे. या गोष्टीचा सोशल मीडियावर कडाडून विरोध करण्यात येत आहे. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्यामुळे नेटीझन्सी अॅमेझॉनवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. अॅमेझॉनच्या विरोधात जवळपास 24,000 हून अधिक ट्वीट करण्यात आले असून यातील काही ट्वीटमध्ये परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना देखील टॅग करण्यात आलं आहे.
हिंदू धर्माच्या देवदेवतांचा अनादर केल्यामुळे नेटकऱ्यांनी अॅमेझॉनवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी #BoycottAmazon हे कॅम्पेन ट्विटरवर सुरू करण्यात आले आहे. युजर्सनी स्क्रिनशॉट शेअर करत अॅमेझॉन हे डिलीट केल्याची माहिती दिली आहे. तर काहींनी इतरांना हे अॅप डिलीट करण्याचे आवाहन केले आहे. अॅमेझॉनवर हिंदू देवतांचे चित्र असलेल्या टॉयलेट सीट आणि डोअर मॅटची विक्री होत असल्याची माहिती काही युजर्सनी ट्विटरवरून दिली. यामध्ये भगवान शंकर, गणपती, हनुमान, गौतम बुद्ध या देवतांचे चित्र असल्याचे सांगण्यात आले आहे. अॅमेझॉनच्या या कृत्याचा सर्वच स्तरातून निषेध करण्यात येत आहे.
अॅमेझॉनने याआधी भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान केला होता. अॅमेझॉनच्या वेबसाईटवर विक्रीसाठी असलेल्या स्टिकरमध्ये भारताचा काही हिस्सा पाकिस्तान आणि चीनमध्ये असल्याचं दाखवण्यात आला होता. शिवाय, भारताच्या नकाशातून जम्मू-काश्मीरचा भाग वगळल्याचेही निदर्शनास आले होते.
परराष्ट्रमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर अॅमेझॉनने हटवले तिरंग्याचे पायपुसणे
कॅनडा येथील अॅमेझॉनच्या वेबसाईटवर भारताच्या राष्ट्रध्वजासारखी पायपुसणी विक्रीला ठेवण्यात आली होती. ही बाब एका नागरिकाने निदर्शनास आणून दिल्यानंतर याची दखल घेत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी त्या पायपुसण्यांची विक्री त्वरित थांबवण्यास आणि बिनशर्त माफी मागण्यास सांगितले होते. यानंतर अॅमेझॉनने त्वरित वेबसाइटवरील तिरंग्याचा अपमान करणारी पायपुसणी हटवली. अॅमेझॉन या ई-कॉमर्स वेबसाईटवर स्वराज यांनी कारवाई करण्याचा इशारा दिल्यानंतर अॅमेझॉनने साइटवरील भारताच्या राष्ट्रध्वजाचा अपमान करणाऱ्या पायपुसणीची विक्री अखेर थांबवली होती.
'आमच्या तिरंग्याचा अपमान करणाऱ्या सर्व उत्पादनांना त्वरित हटवा अन्यथा आम्ही अॅमेझॉनच्या अधिकाऱ्यांना व्हिसा देणार नाही तसेच सध्या ज्या अॅमेझॉनच्या कर्मचाऱ्यांकडे भारताचा व्हिसा आहे, त्यांचा व्हिसा रद्द करू', असा इशारा स्वराज यांनी ट्विटरद्वारे दिला होता. अतुल भोबे नावाच्या एका व्यक्तिने स्वराज यांना ट्विट करुन कॅनडामध्ये विकल्या जात असलेल्या या पायपुसणीबद्दल माहिती देत यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. यानंतर सुषमा स्वराज यांनी तातडीने कॅनडातील भारतीय उच्च-आयोगाला हे प्रकरण अॅमेझोन कॅनडाच्या उच्च अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणण्यास सांगितले होते.