जोधपूर - भारत दौ-यावर आलेले अमेरिकन हवाई दलाचे प्रमुख डेव्हीड एल गोल्डफीन यांनी शनिवारी स्वदेशी बनावटीच्या 'तेजस' या लढाऊ विमानातून उड्डाणाचा अनुभव घेतला. एअर फोर्सच्या जोधपूर तळावरुन त्यांनी तेजसमधून उड्डाण केले. यावेळी एअर व्हाईस मार्शल एपी सिंह सहवैमानिक म्हणून त्यांच्यासोबत होते. अमेरिकन आणि भारतीय हवाई दलामधील दृढसंबंधांचे हे संकेत आहेत असे संरक्षण दलातील सूत्रांनी सांगितले.
यापूर्वी सिंगापूरचे संरक्षण मंत्री इंग हेन यांनी सुद्धा तेजसमधून उड्डाणाचा अनुभव घेतला आहे. भारत-अमेरिकासंबंध अधिक दृढ व्हावेत या हेतुन डेव्हीड गोल्डफीन गुरुवारपासून भारत दौ-यावर आहेत. परदेशी पाहुणे तेजसचा हवेतील थरार अनुभवताना भरभरुन कौतुक करत आहेत पण भारतीय हवाई दल तेजसबद्दल फारसे उत्सुक्त नाहीय. भारतीय हवाई हद्दीच्या संरक्षणासाठी एकटया 'तेजस'वर अवलंबून चालणार नाही.
स्वदेशी बनावटीचे हे लढाऊ विमान स्वसंरक्षणासाठी पुरेसे ठरणार नाही असे भारतीय हवाई दलाकडून केंद्र सरकारला सांगण्यात आले आहे. तेजस हे जेएएस 39 ग्रिपेन, एफ-16 या लढाऊ विमानांशी तेजस स्पर्धा करु शकत नाही. ग्रिपेन, एफ-16 च्या तुलनेत तेजसमध्ये अजून भरपूर सुधारणांची आवश्यकता आहे असे हवाई दलाने सांगितले.
काय म्हणाले सिंगापूरचे संरक्षण मंत्री तेजसबद्दल सिंगापूरचे संरक्षण मंत्री इंग हेन नोव्हेंबरमध्ये भारत दौ-यावर आले होते. त्यावेळी त्यांनी कालायकुंदा विमानतळावरुन तेजसमधून उड्डाण केले. जवळपास अर्धा तास त्यांनी तेजसचे कौशल्य अनुभवले. तेजस एक उत्कृष्ट लढाऊ विमान असून मला या विमानाने आकर्षित केले आहे असे हेन पत्रकारांशी बोलताना म्हणाले. तेजस विमानाच्या खरेदीमध्ये सिंगापूरला स्वारस्य आहे का ? या प्रश्नावर हेन म्हणाले कि, मी वैमानिक नाहीय. तांत्रिक विषयाचे जाणकार यासंबंधी निर्णय घेतील. बहरीन एअर शोच्यावेळीही तेजसने आपले कौशल्य दाखवले होते त्यावेळी मध्य आशियातील काही देशांनी तेजसच्या खरेदीमध्ये रस दाखवला होता असे संरक्षण मंत्रालयाशी संबंधित सूत्रांनी सांगितले.