पाटणा - एकीकडे देशात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असताना दुसरीकडे भाजपानेबिहार विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज व्हर्च्युअल रँलीद्वारे कार्यकर्त्यांना संबोधित करत एकप्रकारे बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या प्रचाराचा नारळ फोडला आहे. तसेच अमित शाह यांनी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराची घोषणा केली आहे.
या रँलीला संबोधित करताना अमित शाह म्हणाले की, पुढच्या काही दिवसांमध्ये बिहार विधानसभेची निवडणूक लढली जाईल. ही निवडणूक एनडीए नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली लढेल. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीत एनडीए दोन तृतीयांश बहुमत मिळवेल, असा मला विश्वास आहे. मात्र सध्याची वेळ राजकारण करण्याची नाही. सध्या आपण सर्वांनी मिळून मोदींच्या नेतृत्वाखाली कोरोना विषाणूविरोधात लढले पाहिजे. पुढच्या विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीएला दोन तृतीयांश बहुमत मिळेल, अशी अपेक्षा आहे.
नितीशजी आणि सुशीलजी प्रसिद्धीच्याबाबतीत थोडे कच्चे आहेत. ते गुपचूप लोकांची मदत करतात. त्यांच्या नेतृत्वाखाली बिहार सरकारने कोरोनाविरोधातील लढाई चांगल्या पद्धतीने लढली आहे, असे अमित शाह म्हणाले.
यावेळी अमित शाह यांनी लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांवरही निशाणा साधला. आम्ही बिहारला कंदिलाच्या जमान्यामधून एलईडीच्या युगात घेऊन आलो आहोत. लूट अँड अॉर्डरपासून लॉ अँड अॉर्डरपर्यंतचा प्रवास आम्ही केला आहे. त्यामुळे घराणेशाही करणाऱ्या लोकांनी आपला चेहरा आरशात पाहावा, असा टोलाही त्यांनी लगावला.