भाजपाच्या विजयासाठी अमित शहांना जातो 'मॅन ऑफ द मॅचचा' पुरस्कार - पंतप्रधान मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2017 06:23 PM2017-10-16T18:23:41+5:302017-10-16T18:35:43+5:30
गुजरात गौरव यात्रेमध्ये लाखो भाजपा कार्यकर्त्यांसमोर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.
गांधीनगर - गुजरात गौरव यात्रेमध्ये लाखो भाजपा कार्यकर्त्यांसमोर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. उत्तर प्रदेशसह विविध राज्यांमध्ये भाजपाचा जो विजयरथ धावतोय त्याचे श्रेय अमित शहांना जाते. लोकसभा निवडणुकीच्यावेळी उत्तर प्रदेशच्या निकालाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. उत्तर प्रदेशच्या विजयासाठी अमित शहाच 'मॅन ऑफ द मॅच पुरस्कारा'चे मानकरी आहेत. गुजरातमध्येही त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने विजय मिळवावा अशी इच्छा मोदींनी व्यक्त केली.
1 ऑक्टोंबरपासून भाजपाने गुजरातमध्ये गौरव यात्रा सुरु केली होती. मोदींचे भाषण सुरु असताना अमित शहा स्टेजवर उपस्थित होते. गुजरातमध्ये वर्षअखेरीस विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुकीच्या तारखांची अजून घोषणा झालेली नाही पण आतापासूनच काँग्रेस आणि भाजपामध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोपांचा सामना रंगला आहे. गुजरात हे मोदींचे गृहराज्य आहे. मागच्या 20 वर्षांपासून गुजरातमध्ये भाजपाची सत्ता आहे.
मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असतानाच देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले. त्यांच्या कार्यकाळात गुजरातचा जो विकास झाला तोच गुजरात मॉडेल म्हणून लोकसभा निवडणुकीच्यावेळी देशासमोर ठेवला गेला. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदामुळे मोदींचा पंतप्रधानपदाचा मार्ग सुकर झाला. त्यामुळे गुजरातची निवडणूक भाजपा आणि पंतप्रधान मोदींसाठी प्रतिष्ठेची आहे. इतकी वर्ष एकाच राज्यात सत्ता असेल तर, प्रस्थापित सरकारविरोधात एक लाट असते. ती लाट रोखण्याचे आव्हान शहा-मोदी जोडीसमोर आहे. यावर्षी पाचव्यांदा गुजरातची सत्ता मिळवण्याचे लक्ष्य भाजपाने ठेवले आहे. 182 सदस्यांच्या गुजरात विधानसभेत पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी 150 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे.