Amit Shah In Baramulla:'पाकिस्तानसोबत कोणत्याही प्रकारची चर्चा होणार नाही', काश्मीरमधून अमित शहांची स्पष्टोक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2022 02:56 PM2022-10-05T14:56:37+5:302022-10-05T14:57:05+5:30
Amit Shah In Baramulla: 'गुपकर मॉडेल तरुणांच्या हातात दगड आणि बंदुका देत आहे. मोदींच्या मॉडेलमुळे विकास आणि रोजगार मिळतोय.'
Amit Shah In Baramulla: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी आज दसऱ्याच्या दिवसी जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला येथे एका रॅलीला संबोधित केले. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात भारत-पाकिस्तान संबंधांवर भाष्य केले. 'पाकिस्तानसोबत कोणत्याही प्रकारची चर्चा केली जाणार नाही', अशी स्पष्टोक्ती त्यांनी दिली. तसेच, 'जो परिसर पूर्वी दहशतवादी हॉटस्पॉट होता, तो आता पर्यटनाचा केंद्रबिंदू बनला आहे. वाढत्या पर्यटनामुळे येथील अनेक तरुणांना रोजगार मिळतोय,' असेही ते म्हणाले.
'मोदींच्या मॉडेलमुळे विकास'
पंतप्रधान मोदींचे कौतुक करताना गृहमंत्री म्हणाले, 'गेली 70 वर्षे मुफ्ती आणि कंपनी, अब्दुल्ला यांचा मुलगा येथे सत्तेत होते. परंतू, त्यांनी 1 लाख बेघर लोकांना घरे दिली नाहीत. मोदीजींनी 2014-2022 दरम्यान या 1 लाख लोकांना घरे दिली. मोदीजींच्या मॉडेलमुळे विकास आणि रोजगार मिळतो. तर गुपकर मॉडेल तरुणांच्या हातात दगड आणि बंदुका देत आहे. मोदींच्या मॉडेलमध्ये आणि गुपकरांच्या मॉडेलमध्ये खूप फरक आहे.'
'जम्हूरियत गावागावात नेण्याचे काम मोदींनी केले'
जम्मू-काश्मीरमध्ये जम्हूरियत गावागावात नेण्याचे पहिले काम मोदीजींनी केले आहे. यापूर्वी काश्मीरमध्ये जमहूरियतची व्याख्या तीन कुटुंबे, 87 आमदार आणि 6 खासदार अशी होती. 5 ऑगस्टनंतर मोदीजींनी जम्मू-काश्मीरमधील जम्मूरियतला जमिनीवर, गावापर्यंत नेण्याचे काम केले आहे. आज खोऱ्यात आणि जम्मू-काश्मीरमध्ये 30 हजारांहून अधिक लोक पंचायत, तहसील पंचायतींचे नेतृत्व करत आहेत.
'लवकरच पारदर्शकतेने निवडणुका होतील'
अमित शाह पुढे म्हणाले, 'मतदार यादी तयार करण्याचे काम पूर्ण होताच जम्मू-काश्मीरमध्ये पूर्ण पारदर्शकतेने निवडणुका होतील.
काही दिवसांपूर्वी मी मेहबुबा मुफ्ती यांचे एक ट्विट वाचले होते की, गृहमंत्री येत असाल तर काश्मीरला काय दिले याचा हिशेब विचारा. जम्मू-काश्मीरला आपण काय दिले, याचा हिशेब मी देतो, पण अनेक दशकांपासून तीन कुटुंबांनी जम्मू-काश्मीरवर राज्य केले, त्यांनी काय दिले, त्याचाही हिशेब त्यांनी द्यावा.
'मोदीजींना पाठिंबा देण्यासाठी आले आहेत'
याशिवाय आपल्या कार्यक्रमावर बोलताना ते म्हणाले की, 'येथे रॅली काढण्याची योजना आखली असता, काही लोकांनी बारामुल्लाचा कार्यक्रम ऐकण्यासाठी कोण येणार? असे म्हटले होते. मला आज त्यांना सांगायचे आहे की, या कार्यक्रमात काश्मीरच्या या सुंदर खोऱ्यातील हजारो लोक विकासाची कहाणी ऐकण्यासाठी आणि मोदीजींना पाठिंबा देण्यासाठी आले आहेत.'