नवी दिल्ली : येणाऱ्या लोकसभा निवडणुका भाजपासाठी युद्धच आहेत, ही अटीतटीची लढाई आहे. पण, भाजपाला स्पष्ट बहुमत मिळेल आणि पुन्हा नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होतील, असा दावा भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी केला.
शहा म्हणाले, केंद्रातील मोदी सरकारने साडेचार वर्षांमध्ये देशाचा विकास केल्याने भारताचा जगभर गौरव झाला. त्यामुळे जनता भाजपाच्या पाठी उभी आहे. काँग्रेसकडे नेतृत्व नाही आणि स्पष्ट वैचारिक भूमिकाही नाही. अशा पक्षाला लोकांनी मते दिली, तर देश १00 वर्षे मागे जाईल. पानिपतची लढाई मराठे हरले आणि त्यामुळे देश २00 वर्षे मागे गेला होता, आता तसे होता कामा नये, ही सर्व नेते व कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे.
दिल्लीच्या रामलीला मैदानावर सुरू झालेल्या पक्षाच्या अधिवेशनात ते बोलत होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह भाजपा सत्तेत असलेल्या सर्व राज्यांचे मंत्री, नेते व पदाधिकारी उपस्थित होते. शहा यांनी आपल्या प्रदीर्घ भाषणात मोदी सरकारच्या साडेचार वर्षांतील कार्य, योजना व प्रकल्प यांचा सविस्तर आढावा घेतला. पंतप्रधान मोदी ‘अजेय योद्धा’ असून, त्यांच्या नेतृत्वाखाली लढाई लढायची आहे. विजयी व्हायचे आहे, असे सांगून शहा यांनी काँग्रेस व राहुल गांधी यांच्यावर कडाडून टीका केली. राफेलवरून सरकारवर खोटे आरोप करणारे गांधी कुटुंबीयांनी प्राप्तिकर चुकवल्याचे उघड झाले आहे. पण मोदी सरकारवर निष्कलंक आहे, सरकारचे भ्रष्टाचाराचे एकही प्रकरण नाही. त्यामुळे जनतेच्या भल्यासाठी हेच सरकार पुन्हा येणे गरजेचे आहे.
उत्तर प्रदेशात सपा-बसपा आघाडी झाल्याचा परिणाम होणार नाही. गेल्या वेळी ७३ जागा जिंकलो. यंदा आम्ही त्याहून किमान एक जास्त म्हणजे ७४ जागा जिंकू. राम मंदिर लवकर व्हावे, अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी न्यायालयात प्रयत्न सुरू आहेत. पण काँग्रेस अडथळे आणत आहे, असेही ते म्हणाले.एरवी एकमेकांचे चेहरेही न पाहणा-यांनी केली महाआघाडीयेणा-या लोकसभा निवडणुकांत मोदी यांना पराभूत करण्यासाठी एकमेकांचे एरवी चेहरे न पाहणारे पक्ष व नेते यांनी महाआघाडी केली. पण यांना आपण २0१४ साली पराभूत केले होते, हे लक्षात ठेवा. गरिबांचे कल्याण, सांस्कृतिक राष्ट्रवाद विरुद्ध काहींचा राजकीय स्वार्थ असा सामना होणार असून, स्वार्थी लोकांना जागा दाखवून देणे गरजेचे आहे, असे अमित शहा यांनी सांगितले.