श्रीनगर: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) सध्या जम्मू-काश्मीर (Jammu And Kashmir) दौऱ्यावर आहेत. तीन दिवसीय दौऱ्यादरम्यान अमित शाह यांनी श्रीनगर येथे एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी बोलताना अमित शाह यांनी अनुच्छेद ३७० (Article 370) रद्द करण्याचे पुन्हा एकदा समर्थन केले आहे. गेल्या अडीच वर्षात काश्मीरमधील हिंसा कमी झाली आहे. दगडफेकीच्या घटनांमध्ये मोठी घट झाली आहे. काश्मीरमध्ये मोठे बदल होत असून, ०५ ऑगस्ट २०१९ ही तारीख सुवर्णाक्षरांनी लिहिली जाईल, असे प्रतिपादन अमित शाह यांनी यावेळी बोलताना केले.
जम्मू-काश्मीर तसेच काश्मीर खोऱ्यात भ्रष्टाचार आणि दहशतवाद यांचा अंत झाला आहे. तसेच काश्मीरमधील युवा वर्ग आता विकास, रोजगार, शिक्षण, अभ्यास याचा विचार करू लागला आहे. हा खूप मोठा बदल आहे. काश्मीरमधील हा बदल कायम राहील. तसेच काश्मीरचा विकास कोणीही थांबवू शकत नाही, अशी ग्वाही अमित शाह यांनी यावेळी बोलताना दिली.
५ ऑगस्ट २०१९ ही तारीख सुवर्णाक्षरांनी लिहिली जाईल
जम्मू-काश्मीरमधील ७० टक्के लोकसंख्या ही ३५ वर्षांपेक्षा कमी वयोगटातील आहे. या वयोगटातील लोकांचा आत्मविश्वास वाढवून त्यांना विकासाची जोडल्यास काश्मीरमध्ये पुन्हा एकदा शांतता निश्चितपणे नांदू शकेल. पूर्ण प्रदेशातील ४५०० तरुण क्लब रजिस्टर्ड असून, ४२२९ गावांतील तरुणांच्या कल्याणासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे सांगत जम्मू-काश्मीरच्या इतिहासात ५ ऑगस्ट २०१९ ही तारीख सुवर्णाक्षरांनी लिहिली जाईल. आता युवा वर्गावर मोठी जबाबदारी असल्याचे अमित शाह यांनी यावेळी म्हटले आहे.
दरम्यान, अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा हा पहिलाच जम्मू-काश्मीर दौरा आहे. संपूर्ण जम्मू काश्मीरात सुरक्षा यंत्रणांना सतर्क ठेवण्यात आले आहे. सुरक्षा दलाच्या परवानगीशिवाय याठिकाणी काहीही करणे कठीण आहे. श्रीनगरच्या १५ अतिसंवेदनशील भागात ड्रोनच्या माध्यमातून हवाई देखरेख ठेवण्यात आली आहे. अमित शाह यांचा जम्मू काश्मीर दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे.