नवी दिल्ली, दि. 17 - देशभरात भाजपाचा पाया विस्तारल्यानंतर भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी 2019च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमित शाह यांनी यासंदर्भात आज बैठक आयोजित केली होती, या बैठकीत 2014 च्या निवडणुकीमध्ये ज्या जागांवर पराभव झाला. त्याठिकाणी अधिक मेहनत घ्यावी लागेल, असे मंत्री आणि पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आले. तसेच 2019 च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये 350 हून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य भाजपाने समोर ठेवले आहे. आज झालेल्या बैठकीमध्ये ज्या ठिकाणी भाजपाला पराभव पत्करावा लागला होता. अशा मतदारसंघांसदर्भातील एका प्रेझेंटेशनही आजच्या बैठकीत सादर करण्यात आले. तसेच येत्या दोन वर्षांमध्ये या मतदारसंघांमध्ये नेत्यांनी मेहनत घेतली पाहिजे, असे अमित शाह यांनी नेत्यांना सांगितले. या प्रेझेंटेशनमध्ये पश्चिम बंगाल, ओदिशा, तेलंगाणा, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकमधील जागांचा उल्लेख करण्यात आला आहे, अशी माहिती अंतर्गत सूत्रांनी दिली आहे. गेल्या काही काळापासून सातत्याने पक्षविस्तारासाठी प्रयत्नशील असलेले अमित शाह या राज्यांमधील भाजपाची कामगिरी सुधारू इच्छित आहेत. त्यामुळे या राज्यांमधील मतदार संघांवर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार आज झालेल्या बैठकीमध्ये कुठलेविषय प्राधान्य क्रमावर असतील, याबाबत गुप्तता पाळण्यात आली होती. त्यामुळे मंत्री आणि पदाधिकाऱ्यांना बैठकीत सहभागी होईपर्यंत या बैठकीत 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीची चर्चा होईल, याबाबत कल्पना नव्हती. तसेच बैठक संपल्यानंतरही यापैकी कुणीही प्रसारमाध्यांशी चर्चा केली नाही. भाजपा मुख्यालयात झालेल्या या बैठकीमध्ये भाजपाचे अनेक मंत्री सहभागी झाले होते. त्यांच्यामध्ये प्रकाश जावडेकर, जेपी नड्डा, अनंत कुमार, रविशंकर प्रसाद, नरेंद्र सिंह तोमर, धर्मेंद्र प्रधान, पीयूष गोयल, निर्मला सीतारमण, अर्जुन मेघवाल आणि मनोज सिन्हा यांचा समावेश होता. यावेळी अमित शाहा यांनी सर्व मंत्र्यांकडून त्यांच्या मंत्रालयाच्या योजनांचा प्रत्यक्षात झालेला परिणाम जाणून घेतला. तसेच पक्षसंघटनेशी संबंधित नेत्यांकडून पक्षाबाबत जनमानसात असलेल्या वातावरणाचीही माहिती घेतली. या बैठकीत पक्षसंघटनेशी निगडीत कैलाश विजयवर्गीय, राम माधव, अनिल जैन, मुरलीधर राव आणि अरुण सिंह हे सहभागी झाले होते. अमित शाह पक्षाच्या संभाव्य कामगिरीचा कानोसा घेण्यासाठी दर चार महिन्यांनी सर्व्हे करवून घेत आहेत. 2014 साली झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाने 284 जागा जिंकल्या होत्या. मात्र सद्यस्थितीत अत्यंत कमकुवत आणि विस्कळीत झालेला विरोधी पक्ष पाहता 2019 साली आरामात 350 हून अधिक जागा जिंकता येतील असा शाहा यांचा अंदाज आहे.
भाजपासाठी अमित शाहांचे मिशन 350+, सुरू केली 2019 च्या निवडणुकीची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2017 7:41 PM