अमृतसर -रावणदहन पाहाण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या राहिलेल्यांना दोन भरधाव ट्रेनने चिरडल्याची हृदयद्रावक घटना अमृतसरच्या चौडा बाजारमध्ये शुक्रवारी रात्री घडली होती. दरम्यान, येथे आयोजित करण्यात आलेल्या रावणदहनाच्या कार्यक्रमाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारण्यास स्थानिक प्रशासन आणि रेल्वेकडून टाळाटाळ होत असली तरी येथील आयोजनाला पोलीस प्रशासनाकडून परवानगी मिळाली असल्याचे पुरावे समोर आले आहेत.
येथे रावण दहनाचा कार्यक्रम करणाऱ्या दसरा समितीने पोलिसांना पत्र लिहून सुरक्षा व्यवस्था पुरवण्याची मागणी केली होती. तसेच या मागणीचा विचार करून पोलीस प्रशासनाने आयोजकांना कार्यक्रमाचे आयोजन करण्याची परवानगी देण्यात आली होती. पोलिसांचा या दसरा कार्यक्रमाबाबत कुठलाही आक्षेप नसल्याचे असिस्टंट सब इन्स्पेक्टर दलजीत सिंह यांनी परवानगीच्या पत्रात म्हटले होते. मात्र कार्यक्रमाला परवानगी देऊनही येथे पोलीस उपस्थित नव्हते. त्यामुळे मोठी दुर्घटना घडली. रावणदहन पाहाण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या राहिलेल्यांना दोन भरधाव ट्रेनने चिरडल्याची हृदयद्रावक घटना अमृतसरच्या चौडा बाजारमध्ये शुक्रवारी रात्री घडली होती. या अमृतसरच्या भीषण दुर्घटनेत ६१हून अधिक जण ठार, तर ७२ जण जखमी झाले. जालंधरहून अमृतसरकडे ट्रेन येत असतानाच विरुद्ध दिशेनेही दुसरी ट्रेन आली. त्यामुळे रुळांवर उभे असलेल्या बेसावध लोकांना आपला जीव वाचविण्याकरिता धावपळ करायची उसंतही मिळाली नाही.