अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण अपघाताला रेल्वे प्रशासनच जबाबदार आहे, ट्रेनच्या मोटरमनने प्रसंगावधान दाखवलं असतं तर अनेकांचे प्राण वाचू शकले असते, असा आरोप काही मंडळी जोरजोरात करताहेत. पोलिसांनी या मोटरमनला चौकशीसाठी ताब्यातही घेतलंय. परंतु, त्यानं जे केलं ते योग्यच होतं, असा दावा रेल्वे बोर्डाने केला आहे.
ट्रॅकवर बरीच माणसं बसल्याचं मोटरमनला दिसलं, तेव्हा ट्रेनचा वेग ताशी 90 किलोमीटर होता. मोटरमनने पूर्ण कसब पणाला लावून तो ताशी 65 किलोमीटर केला. या वेगातील ट्रेन थांबण्यासाठी किमान 625 मीटर अंतर गरजेचं आहे. त्यामुळे वेग कमी करूनही दुर्घटना टाळता आली नाही, अशी माहिती रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्वनी लोहानी यांनी दिली. मोटरमनने इमर्जन्सी ब्रेक का लावला नाही, असा प्रश्न बरेच जण करताहेत. परंतु, हा प्रयत्न अधिक जीवघेणा ठरला असता. ताशी 90 किमी वेगाने ट्रेन धावत असताना इमर्जन्सी ब्रेक लावला असता तर ट्रेनचे डबे ट्रॅकवरून घसरले असते आणि परिस्थिती हाताबाहेर गेली असती, याकडे लोहानी यांनी लक्ष वेधलं.
मोटरमनने हॉर्न वाजवला असेल, तरी तो फटाके आणि ध्वनिक्षेपकांमुळे ट्रॅकवर बसलेल्या लोकांना ऐकू गेला नसावा. तसंच, लेव्हल क्रॉसिंगही घटनास्थळापासून दूर असल्यानं अधिकारीही काही करू शकत नव्हते, असं लोहानी यांनी स्पष्ट केलं. या कार्यक्रमाची पूर्वसूचना रेल्वेला देण्यात आली नव्हती. त्यामुळे या अपघातासाठी रेल्वेला जबाबदार धरणं चुकीचं असल्याचं प्रशासनानं म्हटलं आहे.
अमृतसरजवळील जौडा रेल्वेफाटक परिसरातील चौरा बाझार येथे शुक्रवारी रात्री रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होते. त्या कार्यक्रमासाठी हजारो जण उपस्थित होते. रावण दहन झाले उपस्थितांपैकी अनेक जण ट्रॅकवर उभे होते. त्याचवेळी भरधाव वेगात आलेल्या ट्रेननं अनेकांचा उडवलं. अपघातानंतर घटनास्थळावर मृतदेहांचा खच पडला होता. या दुर्घटनेत आत्तापर्यंत 60 जणांचा मृत्यू झाला असून 50 हून अधिक जण जखमी आहेत. या अपघाताच्या चौकशीचे आदेश रेल्वे प्रशासनानं दिलेत.
अमृतसरमधील या भीषण दुर्घटनेबद्दल रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनीही दुःख व्यक्त केलं आहे.
पाहा, कसा घडला अपघात...