मुंबई-
महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे सर्वेसर्वा आणि देशातील सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. समाजातील विविध घटनांची दखल ते घेत असतात आणि तरुणाई, गरजूंना मदत करण्यात पुढाकार घेत असतात. आनंद महिंद्रांच्या याच भूमिकेचं सोशल मीडियात नेटिझन्स देखील कौतुक करत असतात. आनंद महिंद्रांनी एक ट्विट केलं की त्याची जोरदार चर्चा होत असते. त्यांचा नेटिझन्ससोबत चांगला संवाद असतो. स्वत: आनंद महिंद्रा नेटिझन्सनं विचारलेल्या प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तर देखील देत असतात. असाच एक प्रश्न एका युझरनं आनंद महिंद्रांना विचारला आणि त्यावर त्यांनी जे उत्तर दिलं त्याची चर्चा होत आहे.
एका युझरनं आनंद महिंद्रा यांना त्यांचं थेट तुमचं शिक्षण किती झालंय असा प्रश्न विचारला. महिंद्रा यांनी मोठ्या मनानं याचं लक्षवेधी उत्तर दिलं आहे.
नेमकं काय घडलं?त्याचं झालं असं की ट्विटरवर अभिषेक दुबे नावाच्या एका हँडलवरुन एका चिमुकलीचा अभ्यास करतानाच फोटो ट्विट करण्यात आला. "आज मी हिमाचलच्या स्टॉन (Staun) भागात सहलीवर होतो. या चिमुरडीला एकटं बसून लिहिताना पाहून मला नवल वाटले. तिची अभ्यासाबाबत असलेली एकाग्रता पाहून मला किती आश्चर्य वाटले ते सांगता येणार नाही", अशा कॅप्शनसह अभिषेक दुबे नावाच्या व्यक्तीनं फोटो ट्विट केला होता. हेच ट्विट आनंद महिंद्रा यांनी रिट्विट केले. जे सोशल मीडियावर व्हायरल झाले. फोटोमध्ये एक चिमुकली मुलगी निसर्गाच्या सानिध्यात अभ्यास करताना दिसत आहे.
चिमुकलीच्या याच फोटोचा आधार घेत एका युझरनं आनंद महिंद्रा यांना तुमचं शिक्षण किती झालंय? असा सवाल विचारला. या प्रश्नाचीही आनंद महिंद्रा यांनी दखल घेतली आणि उत्तर दिलं. "खरं सांगायचं तर माझ्या वयात कोणत्याही गुणवत्तेची एकमेव पात्रता म्हणजे अनुभव हिच आहे", असं खणखणीत उत्तर आनंद महिंद्रा यांनी दिलं. महिंद्रा यांनी दिलेल्या उत्तरावर नेटिझन्स भरभरुन व्यक्त होत आहेत. त्यांचं कौतुक करत आहेत.