हैदराबाद : देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने देशात आणखी दोन आठवडे लॉकडाऊन वाढविला आहे. या लॉकडाऊनमध्ये केंद्र सरकारने काही सवलती सुद्धा दिल्या आहेत. या सवलतीमध्ये दारूची दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, आंध्र प्रदेश सरकारने दारूच्या किंमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे.
आंध्र प्रदेश सरकारने दारूच्या किंमतीत 25 टक्के वाढ जाहीर केली आहे. दारूबंदीच्या दुकानातील गर्दी नियंत्रित करण्याच्या उद्देशाने ही वाढ करण्यात आल्याचे सरकारचे म्हणणे आहे. दरम्यान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांनी कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊन यासंदर्भात एक बैठक घेतली. त्यानंतर राज्यात दारूबंदी अधिक लागू करण्यासाठी पाऊले उचलली गेली आहेत, असे त्यांनी सांगितले.
याचबरोबर, राज्यातील दारू दुकानांची संख्या कमी करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार दारूची दुकाने वाढीव किंमतीवर उघडण्यास सांगण्यात आली आहेत. तसेच, दुकानदारांना सोशल डिस्टंसिंग आणि लॉकडाऊनचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशात आणखी दोन आठवड्यांसाठी लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. आता देशात 4 मे पासून 17 मे पर्यंत लॉकडाऊन असणार आहे. यासंदर्भात गृह मंत्रालयाने दोन दिवसांपूर्वी परिपत्रक जारी केले आहे. यामध्ये रेड झोनमध्ये कडक संचारबंदी असणार आहे. तर ग्रीन झोनमध्ये उद्योगधंदे सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
याशिवाय, ग्रीन आणि ऑरेंज झोनसाठी काही अटी-शर्ती शिथिल करण्यात आल्या आहेत. मात्र, रेड झोनमध्ये कडक संचारबंदी असणार आहे. याचबरोबर, लॉकडाऊनच्या अटीशर्थींमध्ये सूट देऊन मजुरांना घरी परतण्याची सशर्त परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर विविध राज्यांची सरकारे आपल्या राज्यातील मजुरांना परत आणण्यासाठी काम सुरू केले आहे.