अमरावती - आंध्र प्रदेशमधील जगनमोहन रेड्डी सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत विधान परिषद बरखास्त करण्याच्या प्रस्तावाला मंजूर करण्यात आलं आहे. वायएसआर काँग्रेसचे आमदार गुडीवाडा अमरनाथ यांनी याबाबत माहिती दिली आहे. कॅबिनेटच्या बैठकीनंतर आंध्र प्रदेश सरकारचं विशेष अधिवेशनाला सुरुवात होणार आहे.
चंद्राबाबू नायडू यांचा विरोध कॅबिनेटमध्ये या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर विधिमंडळाचं विशेष अधिवेशन सुरु होईल. या अधिवेशनात विधान परिषद बरखास्त करण्याच्या प्रस्तावावर चर्चा होईल. सूत्रांनुसार माजी मुख्यमंत्री अन् टीडीपी अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाकडून सरकारच्या या प्रस्तावाचा विरोध करण्यात येणार आहे. रविवारी नायडू यांनी पक्षाच्या आमदारांची बैठक घेतली. ज्यामध्ये पक्षाचे २१ आमदार विशेष अधिवेशनावर बहिष्कार टाकणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.
आंध्र प्रदेशमध्ये विधान परिषदेत ५८ सदस्य आहेत. जगन मोहन रेड्डी यांच्या हातात राज्याची सत्ता असली तरी विधान परिषदेत चंद्रबाबू नायडू यांचे बहुमत आहे. या सभागृहात टीडीपीचे २७ तर वायएसआरचे ९ सदस्य आहेत. विधान परिषदेत जगन मोहन रेड्डी यांच्या राज्याच्या तीन राजधान्या या प्रस्तावाला अडकवलं गेले. विधान परिषदेने हा प्रस्ताव सिलेक्ट समितीकडे पाठवला. त्यामुळे या प्रस्तावाला विलंब होईल.