आंध्र प्रदेशात संततधार पावसामुळे आलेल्या पुरात 17 जणांचा मृत्यू झाला तर 100 हून अधिक लोक वाहून गेले आहेत. राज्यात मुसळधार पावसाने कहर केला आहे. तिरुपती मंदिरातून आलेल्या फोटोंमध्ये शेकडो यात्रेकरू भीषण पुरात अडकलेले दिसत आहेत. तिरुपतीच्या बाहेरील स्वर्णमुखी नदीला पूर आला आहे. येत आलेल्या पुरामुळे परिस्थिती एवढी बिकट झाली आहे की, बचाव कार्यासाठी हेलिकॉप्टर आणि जेसीबीची मदत घ्यावी लागत आहे. आकाशात हेलिकॉप्टर आणि खाली जेसीबीच्या माध्यमातून लोकांना मदत केली जात आहे.
अनंतपूर जिल्ह्यातील कादिरी भागात रात्री उशिरा मुसळधार पावसामुळे 3 मजली जुनी इमारत कोसळून तीन मुले आणि एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. बचावकार्य सातत्याने सुरू आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अजूनही 4 हून अधिक लोक अडकले आहेत. सर्कल इन्स्पेक्टर सत्यबाबू यांनी ही माहिती दिली आहे.
घाट रस्ता आणि तिरुमला हिल्सवर जाण्याचा मार्ग बंद करण्यात आला आहे. तिरुपतीच्या हद्दीतील स्वर्णमुखी नदीला पूर आला असून जलाशय भरले आहेत. अनेक लोक पुरात अडकल्याचे वृत्त आहे. तीन राज्य परिवहन बसही अडकल्या आहेत आणि 12 जणांना वाचवता आले नाही. परिस्थिती हाताळण्यासाठी राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती निवारण पथके तैनात करण्यात आली असून बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
पुरामुळे अनेक ठिकाणी रस्ते खराब झाले असून रेल्वे, रस्ते आणि हवाई वाहतुकीवर परिणाम झाला आहे. रायलसीमा भागाला सर्वाधिक फटका बसला आहे. राज्यातील चित्तूर, कडप्पा, कुरनूल आणि अनंतपूर जिल्हे प्रभावित झाले आहेत. गुरुवारपासून पाऊस सुरूच आहे. चेयुरू नदीला पूर आला आहे. अण्णामय्या सिंचन प्रकल्पालाही याचा फटका बसला आहे. परिसरातील मुसळधार पावसामुळे कडप्पा विमानतळही 25 नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार आहे.