पंतप्रधान मोदी यांची खासदारांविषयी नाराजी
By admin | Published: March 22, 2017 12:35 AM2017-03-22T00:35:38+5:302017-03-22T00:35:38+5:30
पंतप्रधान मोदींनी संसदेत भाजपा सदस्य गैरहजार राहात असल्याबद्दल कठोर शब्दांत नाराजी व्यक्त केली. मंगळवारी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या
सुरेश भटेवरा / नवी दिल्ली
पंतप्रधान मोदींनी संसदेत भाजपा सदस्य गैरहजार राहात असल्याबद्दल कठोर शब्दांत नाराजी व्यक्त केली. मंगळवारी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला अनेक मंत्री उपस्थित नव्हते. सभापती हमीद अन्सारींनी त्याबाबत खेद व्यक्त केला होता आणि दुसरीकडे विरोधकांनीही सरकारला चिमटे काढले. पंतप्रधानांनी याची गांभीर्याने दखल घेतली.
गेले दोन दिवस दोन्ही सभागृहांत सत्ताधारी बाके रिकामी होती. दोन्ही ठिकाणी अनेकदा कोरमही नव्हता. संसदीय कामकाजमंत्री अनंतकुमार यांनी बैठकीत याचा उल्लेख करताच, करड्या शब्दांत सदस्यांची हजेरी घेत पंतप्रधान मोदी म्हणाले की, कामकाज सुरू असताना भाजपाचे जे सदस्य सभागृहाऐवजी, लॉबीत अथवा अन्यत्र हिंडतात, त्यांची संसदेतील उपस्थिती ग्राह्य धरली जाणार नाही. कोणत्याही सदस्याला मी अचानक फोन करून बोलावून घेईन. आपल्या अनुपस्थितीचा त्याला खुलासा करावा लागेल. परदेशात असतानाही मी अधिकाऱ्यांमार्फत सदस्यांच्या उपस्थितीवर लक्ष ठेवणार आहे.
ते म्हणाले, संसदेत विधेयक मांडणे, कायदा तयार करण्यासाठी मतदानाला उपस्थित राहणे, एवढ्याने खासदारांची जबाबदारी संपत नाही. विषय केवळ उपस्थितीपुरता मर्यादित नाही. रा. स्व.संघाच्या पदाधिकाऱ्याचे एक विधान उधृत करीत पंतप्रधान म्हणाले, स्वयंसेवकांना उद्देशून संघाचे पदाधिकारी म्हणायचे, स्वयंसेवकांना खूप काम आहे, फक्त संघाच्या शाखेत हजर राहायला वेळ नाही. त्याच धर्तीवर खासदारांना खूप काम आहे. फक्त संसदेच्या कामकाजात भाग घ्यायला वेळ नाही, असे मी समजेन. मात्र, असे चालणार नाही.
मोदी सरकारला २६ मे रोजी तीन वर्षे पूर्ण होतील. त्या निमित्ताने भाजपातर्फे देशभर विविध कार्यक्रम आयोजित केले जातील. संसदेत आपण काय केले, कोणते कायदे मंजूर केले, कोणत्या योजना राबवल्या, याचे तपशील जनतेला समजावून सांगण्याची जबाबदारी संसद सदस्यांवर आहे, असे सांगून, सभागृहात अनुपस्थित राहाणारे सदस्य ती कशी पार पाडणार? असा सवालही मोदी यांनी केला.