नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असलेले पाहायला मिळत आहेत. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका शेतकऱ्याने योग्य भाव न मिळाल्याने रागाच्या भरात तब्बल 10 क्विंटल फ्लॉवर रस्त्यावर फेकून दिल्याचा घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या पीलीभीतमधील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हा सर्व प्रकार घडला आहे. शेतमालाला चांगला भाव मिळाला नाही म्हणून निराश झालेल्या शेतकऱ्याने सर्व फ्लॉवर रस्त्यावर टाकून दिला. फेकण्यात आलेले फ्लॉवर उचलण्यासाठी लोकांची झुंबड उडालेली पाहायला मिळाली आहे.
सलीम असं या शेतकऱ्याचं नाव असून त्याने आपल्या शेतात भरघोस असं फ्लॉवरचं उत्पादन घेतलं होतं. शेतात दिवस-रात्र राबून आणि हजारो रुपये खर्च करून त्याने फ्लॉवरची शेती केली होती. मात्र सलीम जेव्हा बाजारात विक्रीसाठी आला तेव्हा त्याला व्यापाऱ्यांनी फ्लॉवरसाठी फक्त एक रुपये किलो दर सांगितला. "माझी अर्धा एकर शेतजमीन आहे. ज्यामध्ये फ्लॉवरचं बियाणं, उत्पादन, खतं या सर्वांसाठी जवळपास आठ हजार रुपये खर्च आला. याचबरोबर हा माल येथे बाजारात आणण्यासाठी मला चार हजार खर्च आला" अशी माहिती सलीमने दिली आहे.
"एक किलो दराने फ्लॉवर विकण्यापेक्षा तो रस्त्यावर फेकून दिला"
सलीमने "सध्या बाजारात फ्लॉवरची किंमत 10 ते 12 रुपये किलो आहे. त्यामुळेच मला किलोमागे किमान आठ रुपये मिळतील अशी अपेक्षा होती. जेव्हा माझा शेतमाल एक रुपया किलोने विकत घेण्याची तयारी व्यापाऱ्यांनी दाखवली तेव्हा मला हा शेतमाल फेकून देण्याशिवाय कोणता पर्याय हाती शिल्लक नव्हता. नाहीतर परत पैसे खर्च करुन तो मला घरी आणावा लागला असता" असं म्हटलं आहे. एक किलो दराने फ्लॉवर विकण्यापेक्षा तो रस्त्यावर फेकून दिला जेणेकरून गरजू लोक देखील त्याचा वापर करू शकतील असं देखील त्याने म्हटलं आहे.
"फ्लॉवरला भाव न मिळाल्याने तोटा झाला"
टीओआयने दिलेल्या वृत्तानुसार, सलीमने पुढील पिकांसाठी आता पैसे नाहीत त्यामुळे कोणत्यातरी बँकेतून कर्ज घ्यावं लागणार असल्याचं म्हटलं आहे. फ्लॉवरला भाव न मिळाल्याने जो तोटा झाला आहे. माझ्या कुटुंबामध्ये आई, भाऊ, पत्नी आणि दोन लहान मुलं असल्याचं म्हटलं आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विजिल बालयान यांनी भाज्या या हमीभावाअंतर्गत येणाऱ्या पिकांमध्ये नाहीत त्यामुळे आम्ही सुद्धा काही करू शकत नाही, असं म्हटलं आहे. भाज्यांच्या व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी करुन जास्तीत जास्त नफा कमवण्याचा व्यापाऱ्यांचा प्रयत्न असतो असंही बालयान यांनी स्पष्ट केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
बाबो! 20, 40 नाही तर तब्बल 82 हजार रुपये किलो, देशात "या" ठिकाणी पिकतेय जगातील सर्वात महागडी भाजी
बिहारच्या औरंगाबादमध्ये 82 हजार रुपये किलो विकणारी भाजी पिकवली जात आहे. या भाजीची शेती केली जात असून ही जगातील सर्वात महागडी भाजी असल्याचं सांगितलं जात आहे. भाजीची किंमत ऐकून अनेकांना धक्का बसला आहे. हॉप शूट्स (Hop Shoots) असं जगातील सर्वात महागड्या भाजीचं नाव आहे. एक किलो Hop Shoots ची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 1000 युरो म्हणजेच 82 हजार रुपये आहे. ही भाजी सर्वसाधारणपणे दुकानात वा भाजी विक्रेत्यांकडे पाहायला मिळत नाही. औरंगाबादमधील शेतकरी अमरेश कुमार सिंह यांच्या शेतामध्येच ही भाजी पाहायला मिळते. नवीनगर प्रखंड येथील करमडीह गावात याची शेती केली जात आहे. अमरेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय भाजी अनुसंधान वाराणसी कृषी वैज्ञानिक डॉक्टर लाल यांच्या मार्गदर्शनाखाली या भाजीची ट्रायल शेती करण्यात आली आहे.