अण्णा हजारेंचा एल्गार, आजपासून दिल्लीत सत्याग्रह आंदोलन, मोदी सरकार अडचणीत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2018 08:08 AM2018-03-23T08:08:36+5:302018-03-23T08:08:36+5:30
आजपासून दिल्लीत अण्णा हजारेंचे सत्याग्रह आंदोलन, सरकारकडून वाटाघाटीचे प्रयत्न
नवी दिल्ली - शेतक-यांचे प्रश्न आणि लोकपालबाबत आंदोलनासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आजपासून दिल्लीत आंदोलन करणार आहेत. आज 23 मार्च अर्थात शहीद दिनाचं औचित्य साधून अण्णा आंदोलनाची सुरुवात करणार आहेत.
रामलीला मैदानात होणाऱ्या या आंदोलनामुळे मोदी सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. हजारे यांना आंदोलनापासून परावृत्त करण्यासाठी भाजपा सरकारने प्रयत्न देखील केले. मात्र, त्यानंतरही अण्णा हजारे आंदोलनावर ठाम आहेत.
आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी सशर्त परवानगी दिली आहे. आज सकाळी 9 वाजता दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनातून अण्णा राजघाटाकडे कूच करतील. राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना अभिवादन करणार आहेत. अण्णा हजारे रामलीला मैदानावर धरणं आंदोलन करणार असून, अण्णांच्या या आंदोलनाला काँग्रेसनंही पाठिंबा दिला आहे.
लोकसभा निवडणुकीत आश्वासन देऊनही मोदी सरकारने गेल्या चार वर्षांत लोकपाल व लोकायुक्ताची नियुक्ती केली नाही. लोकपालची अंमलबजावणी तसेच शेतकऱ्यांना हमीभाव, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी अशी विविध मागण्यांसाठी त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे अस्त्र उगारले आहे. या आंदोलनामुळे मोदी सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
#Visuals from Ramlila Maidan in #Delhi where social activist Anna Hazare's will today begin an indefinite fast demanding a competent Lokpal and better production cost for farm produce pic.twitter.com/X0zT19x2aM
— ANI (@ANI) March 23, 2018
सरकारकडून वाटाघाटीचे प्रयत्न -
दरम्यान, अण्णांनी आंदोलन मागे घ्यावं, यासाठी सरकारकडून काल रात्री उशीरापर्यंत वाटाघाटी सुरु होत्या. केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत, महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी काल रात्री अण्णा हजारे यांच्याशी महाराष्ट्र सदनात चर्चा केली.
कृषी मूल्य आयोगास स्वायत्तता देण्याच्या मागणीवर सरकार सकारात्मक आहे. पण इतर मागण्यांसाठी आंदोलन करण्यावर अण्णा ठाम आहेत. अण्णा महाराष्ट्रातून दिल्लीला रवाना होण्याआधी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दोनवेळा अण्णांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अण्णा आंदोलनावर ठाम राहिले.
अण्णांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते दिल्लीला रवाना
अण्णा हजारे यांच्या दिल्ली येथील सत्याग्रह आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जामखेड येथून २५ जणांचा गट बुधवारी रवाना झाला.
या सत्याग्रह आंदोलनासाठी येथील समाजसेवक संतोष पवार, प्रा. मधुकर राळेभात, गुलाब जांभळे व सिध्दार्थ घायतडक यांनी पुढाकार घेतला. संतोष पवार म्हणाले, अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारला विविध मागण्यांसाठी निवेदन दिले होते. परंतु चार वर्षे होत आली तरी मागण्यांची दखल घेण्यात आली नाही. अण्णांच्या पाठिंब्यासाठी स्वयंस्फूर्तीने कार्यकर्ते जमा झाले आहेत. दि. २३ रोजी आम्ही सत्याग्रह आंदोलनाला पाठिंबा देऊ व मागण्या मान्य होईपर्यंत तेथून उठणार नाही, असा निर्धार त्यांनी केला.