नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सोमवारी लोकसभेत बुडीत कर्जाचा मुद्दा उपस्थित करून हेतूत: कर्ज न फेडणाºया बड्या ५० लोकांच्या नावांची यादी जाहीर करा, अशी मागणी केली. प्रश्नोत्तर तासात गांधी यांना हेतुत: कर्ज न फेडणाऱ्यांच्या नावाशी संबंधित दुसरा पुरवणी प्रश्न विचारण्यास अनुमती नाकारल्यामुळे सभागृहात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली व काँग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग केला.अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दुपारी प्रश्नोत्तर तास संपला असे जाहीर केल्यावर त्याचा निषेध झाला. प्रश्नोत्तर तासाची वेळ सकाळी ११ ते दुपार अशी होती. पहिला पुरवणी प्रश्न विचारताना राहुल गांधी म्हणाले की, ‘‘हेतुत: जे लोक कर्ज फेडत नाहीत अशा बड्या पहिल्या ५० जणांची (ज्यात निधी दिला गेला आणि बँकांंनी ती रक्कम बुडीत कर्ज म्हणून नोंद केली त्यांच्यासह) नावे मला हवी आहेत.’’अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी प्रश्नाला उत्तर द्यायला सुरुवात करताच राहुल गांधी आणि सभागृहातील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी निषेध केला. ते म्हणाले, ‘‘केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या सभागृहात उपस्थित असताना त्यांनीच उत्तर दिले पाहिजे.’’ त्यावर ओम बिर्ला यांनी सामान्यत: प्रश्नोत्तर तासात प्रश्नांची उत्तरे कनिष्ठ मंत्रीच देतात, असे सांगितले.बँका अडचणीत‘‘भारतीय अर्थव्यवस्था कठीण मार्गक्रमण करीत आहे. बँकिंग व्यवस्था अडचणींना तोंड देत आहे, बँकिंग घसरत चालली असून आणि आणखी अनेक बँका अपयशी ठरणार आहेत.बँका अपयशी ठरण्याच्या कारणांपैकी एक मुख्य कारण हे आहे की, मोठ्या प्रमाणावर लोकांनी बँकेचा पैसा चोरला आहे’’, असे राहुल गांधी म्हणाले.‘‘ज्यांनी बँकांचा पैसा चोरला त्या सगळ्यांना देशात परत आणून शिक्षा केली जाईल, असे पंतप्रधान म्हणाले होते; परंतु मला माझ्या साध्या प्रश्नाचेही उत्तर मिळालेले नाही’’, असे गांधी म्हणाले.
ठरवून कर्ज बुडविणाऱ्या ५० जणांची नावे सांगा, लोकसभेत राहुल गांधींची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 4:45 AM