आणखी दलित भाजपा खासदार पक्षनेतृत्वावर नाराज
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 06:11 AM2018-12-10T06:11:32+5:302018-12-10T06:13:45+5:30
बंडाचा झेंडा हाती घेण्याची शक्यता; हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थानात बंडखोरी वाढली
- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : लोकसभेच्या उत्तर प्रदेशातील भाजपाच्या सदस्य सावित्रीबाई फुले यांनी पक्षत्याग केल्यानंतर भाजपाचे आणखी काही लोकसभा सदस्य बंडाचा झेंडा हाती घेण्याच्या विचारात आहेत. भाजपाच्या कट्टर समर्थक समजणाऱ्या व पहिल्यांदाच लोकसभेत निवडून गेलेल्या फुले यांनी केलेल्या पक्षत्यागापासून प्रेरणा मिळालेले हे खासदार पक्षाविरुद्ध आपली नाराजी व्यक्त करीत आहेत.
खासदार शत्रुघ्न सिन्हा आणि कीर्ती आझाद यांची प्रसिद्धी तर बंडखोर अशीच आहे. त्यांना आता हरियाणातील धर्मवीर येऊन मिळाले आहेत. उत्तर प्रदेशातील किमान पाच दलित खासदारांनी आमच्या समाजाला अशाच पद्धतीने दडपले जाणार असेल तर आम्ही पक्षात राहणार नाही, असे पक्ष श्रेष्ठींना सांगितले आहे. दिल्लीतील दलित खासदाराने पक्षाच्या व्यासपीठावर नुकतीच मला पक्ष सोडण्याशिवाय दुसरा पर्यायच उरलेला नाही अशा शब्दांत आपली काळजी आधीच बोलून दाखवली आहे. हरियाणातून केंद्रात मंत्री असलेल्याने स्वत:चा पक्ष सुरू करण्यासाठी वाटाघाटी सुरू केल्या आहेत.
खासदार ‘बोलायला’ सुरुवात करतील
मध्यप्रदेशातील भाजपाचे खासदार या सगळ्यात सक्रिय असून त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला सांगितले की, पक्षात नाराजी तीव्रतेने वाढत आहे. विधानसभा निवडणुकांचे निकाल काहीही येवो अनेक खासदार ‘बोलायला’ सुरुवात करतील व ते आता पक्ष श्रेष्ठींचे आज्ञाधारक राहणार नाहीत.
या खासदारांपैकी काही जणांना मे २०१९ मध्ये होणाºया लोकसभा निवडणुकीत आपल्याला तिकीट मिळणार नाही याची कल्पना आहे. त्याचे कारण म्हणजे विद्यमान खासदारांपैकी ५० टक्क्यांना पुन्हा संधी नाही, असे पक्ष श्रेष्ठींनी संकेत दिले आहेत.
असे असले तरी ७५ वर्षांच्या वयोमर्यादेचा निकष फार कठोरपणे लावला जाणार नाही. परंतु, किमान १५ वृद्ध खासदारांना पक्ष विश्रांती देणार आहे. ११ डिसेंबर रोजी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार असून प्रमुख तीन हिंदी भाषिक राज्ये भाजपाने गमावली तर ही बंडखोरी वाढणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.