नीरव मोदीमुळे लग्न मोडलं; जाणून घ्या 'त्या' नवरदेवासोबत काय घडलं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 03:29 PM2018-10-08T15:29:34+5:302018-10-08T15:32:04+5:30
कर्जबुडव्या नीरव मोदीचा आणखी एक कारनामा
नवी दिल्ली: पंजाब नॅशनल बँकेला तब्बल 14 हजार कोटी रुपयांचा चुना लावून परदेशात पळालेल्या नीरव मोदीचा आणखी एक कारनामा आता समोर आला आहे. नीरव मोदीमुळेकॅनडात राहणाऱ्या एका व्यक्तीचं लग्न मोडलं आहे. पॉल अल्फान्सो नावाच्या एका कॅनेडियन व्यक्तीनं नीरव मोदीकडून हिऱ्याची अंगठी खरेदी केली. यासाठी त्यानं तब्बल 2 लाख डॉलर (1.47 कोटी रुपये) मोजले. मात्र ही अंगठी खोटी निघाली आणि पॉलचं लग्न मोडलं.
पॉलनं त्याच्या गर्लफ्रेंडला प्रपोज करण्यासाठी हाँगकाँगमधून नीरव मोदीकडून दोन अंगठ्या खरेदी केल्या होत्या. मात्र त्यामध्ये खोट्या हिऱ्यांचा वापर करण्यात आला होता. त्यावेळी पॉलला नीरव मोदीनं पीएनबीमध्ये केलेल्या घोटाळ्याची कल्पना नव्हती. पॉल एका पेमेंट प्रोसेसिंग कंपनीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टनं याबद्दलचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. पॉल 2012 मध्ये पहिल्यांदा नीरव मोदीला भेटला. पुढे दोघांची चांगली ओळख झाली. यानंतर बराच काळ दोघांमध्ये काहीच संवाद नव्हता. एप्रिलमध्ये पॉलनं नीरव मोदीला साखरपुड्यासाठी एक विशेष अंगठी तयार करायला सांगितली. यासाठी आपलं बजेट 1 लाख डॉलर (73 लाख रुपये) असल्याचं पॉलनं सांगितलं. मात्र नीरव मोदीनं त्याला त्यापेक्षा जास्त किमतीची अंगठी देऊ केली. त्या अंगठीची किंमत 88.72 लाख रुपये इतकी होती.
यानंतर पॉलच्या गर्लफ्रेंडनं आणखी एक अंगठी खरेदी करण्यास सांगितली. त्यानंतर पॉलनं नीरवला आणखी एका अंगठीची ऑर्डर दिली. 2.5 कॅरटच्या या अंगठीची किंमत 80 हजार डॉलर म्हणजेच 59.14 लाख रुपये इतकी होती. पॉलनं दोन्ही अंगठ्यांचे पैसे त्याच्या हाँगकाँमधील खात्यात जमा केले. त्यानंतर जूनमध्ये पॉलला दोन्ही अंगठ्या मिळाल्या. या अंगठ्या खऱ्या असल्याचं प्रमाणपत्र लवकरच तुम्हाला पाठवतो, असं पॉलनं नीरवला सांगितलं. गर्लफ्रेंडला अंगठ्यांचा विमा काढायचा असल्यानं लवकरात लवकर प्रमाणपत्र पाठवण्यात यावं, असं पॉलनं वारंवार नीरवला सांगितलं. मात्र नीरवनं फक्त आश्वासनं दिली.
नीरव टाळाटाळ करत असल्यानं पॉलच्या गर्लफ्रेडनं अंगठी खरी आहे की खोटी, हे तपासून पाहण्याचं ठरवलं. त्यासाठी तिनं तज्ज्ञांशी संपर्क साधला. त्यावेळी अंगठीतील हिरे खोटे असल्याचं तिच्या लक्षात आलं. यानंतर पॉल आणि त्याच्या गर्लफ्रेंडला नीरव मोदीनं केलेल्या घोटाळ्याची आणि दिवाळखोरीत निघालेल्या कंपनीची माहिती मिळाली. यामुळे पॉलला धक्काच बसला. यानंतर त्याच्या गर्लफ्रेंडनं त्याला आणखी एक धक्का दिला. तिनं पॉलसोबत ठरलेलं लग्न मोडलं. तू खूप हुशारीनं काम करतोस. मग 2 कोटी रुपयांची फसवणूक झाली, तरी तुझ्या लक्षात कसं आलं नाही? हा व्यवहार करताना सावध राहता आलं नाही का? अशा प्रश्नांचा भडीमार करत पॉलची गर्लफ्रेंडला त्याला सोडून गेली.