संसदेत शिवसेना विरोधी बाकांवर; रालोआ बैठकीचे निमंत्रण नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2019 04:36 AM2019-11-17T04:36:50+5:302019-11-17T06:20:29+5:30
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने रविवारी होणाऱ्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीचे निमंत्रण शिवसेनेला न पाठवून भाजपने आपली भूमिका स्पष्ट केली.
नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने रविवारी होणाऱ्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीचे निमंत्रण शिवसेनेला न पाठवून भाजपने आपली भूमिका स्पष्ट केली. राज्यसभेतील शिवसेना सदस्यांची जागा बदलून त्यांना विरोधी बाकांवर बसविण्याचीही पूर्वतयारी झाल्याचे समजते. अर्थात, शनिवारी सकाळी खा. संजय राऊत यांनी रालोआतून बाहेर पडणे हा आता केवळ उपचार आहे, असे स्पष्टपणे सांगितलेच होते.
दिल्लीत शिवसेनेचे लोकसभेतील नेते विनायक राऊत म्हणाले की, रालोआ बैठकीचे आमंत्रण नसल्याने जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही. राज्यसभेतील शिवसेना सदस्यांची जागा बदलल्याचे समजते. रालोआत शिवसेनेला स्थान नाही, असे म्हणणाऱ्यांनी रालोआची स्थापनाच मुळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंमुळे झाली होती, याची आठवण ठेवावी.
या अधिवेशनावर यंदा भाजप-शिवसेना संघर्षाचे सावट असेल. सभागृहातील भाजपची कोंडी करण्याची एकही संधी न सोडण्याची तयारी शिवसेनेने चालवली आहे. शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या संभाव्य आघाडीचे प्रतिबिंब लोकसभा व राज्यसभेत उमटेल, हे स्पष्ट आहे. तसे झाल्यास राष्ट्रीय पातळीवर काही मुद्द्यांवर या तिन्ही पक्षांतील अभूतपूर्व ऐक्य दिसेल.
भाजपला परिणाम भोगावे लागतील
विनायक राऊत म्हणाले की, भाजपला देशात कुणीही विचारत नव्हते, तेव्हा शिवसेनाप्रमुखांना आसरा दिला. शिवसेनेचा भाजपला आधार होता. आता आधारालाच धक्का देण्याची कृती भाजप नेते करीत आहेत. भाजपला त्याचे परिणाम भोगावे लागतील.