तामिळनाडूत कॉपर प्लांटविरोधातील आंदोलनाला हिंसक वळण; 9 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2018 07:47 PM2018-05-22T19:47:46+5:302018-05-22T23:32:19+5:30
तुतिकोरीनमधील वेदांता स्टरलाईट कॉपर युनिट विरोधात स्थानिक आक्रमक
तुतुकोडी (तुतिकोरिन) : तमिळनाडूच्या तुतिकोरिन या किनारी जिल्ह्यात वेदान्त उद्योग समूहातील स्टरलाइट कंपनीतर्फे उभारण्यात येत असलेल्या ताम्रभट्टी प्रकल्पाच्या विरोधात हजारो रहिवाशांनी मंगळवारी केलेल्या उग्र निदर्शनांना हिंसक वळण लागले. पोलिसांशी केलेल्या गोळीबारात १0 जण ठार व १५ जखमी झाले असून, १३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
आम्ही गोळीबार केलाच नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी पोलीस गोळीबारात निदर्शक मरण पावल्याचे मान्य केले. या प्रकरणाची चौकशी माजी न्यायाधीशांमार्फत करू, असे सांगून, त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना १0 लाख, तर जखमींना ३ लाखांची मदत जाहीर केली. या प्रकारामुळे द्रमुकचे नेते एम. के. स्टॅलिन यांनी कुमारस्वामी यांच्या शपथविधीला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पामुळे हवा व पाण्याचे अतोनात प्रदूषण होते, असा स्थानिकांचा व स्वयंसेवी संस्थांचा आरोप आहे. (वृत्तसंस्था)
प्रचंड बंदोबस्त : मुख्यमंत्री एडापडी पलानीस्वामी यांनी तेथील जनतेला शांततेचे आवाहन केले तर द्रमुक नेते एम. के. स्टॅलिन यांनी पोलिसी अत्याचारांचा निषेध केला. तुतिकोरिनमध्ये आता २ हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
लोकांचा संताप अनावर
स्थानिकांच्या विरोधाला न जुमानता स्टरलाइट कॉपर कंपनीने ताम्रखनिजापासून वर्षाला चार लाख टन शुद्ध तांबे उत्पादित करणारा प्रकल्प या गावात उभारला. आता त्याचा विस्तार करण्यात येणार असल्याचे जाहीर होताच लोकांचा संताप अनावर झाला.