नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात आज अमेरिकेची आठ अपाचे एएच-64 ई लढाऊ हेलिकॉप्टर्स दाखल होणार आहेत. त्यामुळे भारतीय लष्कर आता आणखी सक्षम होणार आहे.
पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर आयोजित कार्यक्रमा अपाचे अत्याधुनिक हेलिकॉप्टर्स हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल बी.एस. धनोआ यांच्या उपस्थितीत हवाई दलात समाविष्ट करण्यात येणार आहे. जगातील आक्रमक हेलिकॉप्टर म्हणून अपाचे अटॅक हेलिकॉप्टर ओळखले जाते. उंच डोंगररांगामध्ये या हेलिकॉप्टरचा वापर केला जातो.
भारताकडून युद्धभूमीवर अत्यंत उपयुक्त असणाऱ्या 22 अत्याधुनिक अपाचे हेलिकॉप्टर्सच्या खरेदीसाठी अमेरिकेसोबत सप्टेंबर 2015 मध्ये करार करण्यात आला होता. कोट्यवधी डॉलर्सचा हा व्यवहार आहे. यातील पहिल्या चार अपाचे हेलिकॉप्टर्सचा पुरवठा 27 जुलै रोजी बोईंगतर्फे हवाई दलाला करण्यात आला होता. हा करार झाल्यानंतर अपाचेची पहिली तुकडी प्राप्त करण्यासाठी चार वर्षांचा कालावधी लागला. बोईंगने आतापर्यंत जगातील अनेक देशांना 2200 अपाचे हेलिकॉप्टर्सचा पुरवठा केला आहे. आपल्या सशस्त्र दलाकरिता या हेलिकॉप्टर्सची खरेदी करणारा भारत हा जगातील 14 देश ठरला आहे.
दरम्यान, 1975 मध्ये अमेरिकेने या हेलिकॉप्टर्सची निर्मिती केली होती, तर 1986 मध्ये ही हेलिकॉप्टर्स पहिल्यांदा युद्धभूमीवर वापरण्यात आली होती. तसेच, कुख्यात दहशतवादी आणि अलकायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेनचा खात्मा करण्यासाठी अमेरिकेकडून या लढाऊ हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला होता. अमेरिकेशिवाय नेदरलँड, इजिप्त, इस्राइलच्या ताफ्यातही अपाचे हेलिकॉप्टर्स आहेत.