मुंबई, दि. 18 - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी रविवारी काँग्रेसचे नेते मनीष तिवारी यांनी मोदींबाबत शिवराळ भाषेत ट्विट करून नव्या वादाला तोंड फोडले होते. पण त्या ट्विटबद्दल मनीष तिवारी यांनी माफी मागितली आहे. पण त्यासोबतच त्यांनी पंतप्रधान मोदी महिलांबद्दल अपशब्द वापरणा-या लोकांना अनफॉलो करणार का असा प्रश्नही विचारला आहे. यावेळी तिवारी यांनी स्वतःची बाजू मांडताना एका पाठोपाठ एक अनेक ट्विट केले.
मनीष तिवारी यांनी एका ट्विटला उत्तर देताना शिवराळ भाषा वापरली होती. ट्विटमध्ये तिवारी यांनी,"याला म्हणतात चु**ला भक्त बनवणे आणि भक्तांना पर्मनंट चु* बनवणे. जय हो! अगदी महात्माजीसुद्धा मोदींना देशभक्ती शिकवू शकत नाहीत!!! असं म्हटलं होतं.
याआधी काँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंह यांनीही मोदींवर पातळी सोडून टीका केली होती. दिग्विजय सिंह यांनी ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख करत असंस्कारी आणि अश्लिल भाषेत टिप्पणी केली होती. दिग्विजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समर्थकांचा भक्त असा उल्लेख केला होता. दिग्विजय सिंह यांनी जो फोटो शेअर केला आहे त्यामध्ये शिवी लिहिण्यात आली होती.