आपचे लोकसभेचे उमेदवार ठरले; दिल्ली, हरयाणाच्या नावांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 06:14 AM2024-02-28T06:14:09+5:302024-02-28T06:14:16+5:30
सर्वांत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून मालवीयनगरचे आमदार सोमनाथ भारती आम आदमी पार्टीचे उमेदवार असतील.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्त्वाखालील आम आदमी पार्टीने आज दिल्ली, हरयाणा लोकसभा मतदारसंघातील सर्व पाचही जागांवर उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. त्यात तीन विद्यमान आमदार आणि दोन माजी खासदारांचा समावेश आहे.
पूर्व दिल्ली या खुल्या लोकसभा मतदारसंघातून ‘आप’ने जातीय राजकारणाला छेद देण्यासाठी दलित समाजाचे उमेदवार आमदार कुलदीप कुमार यांची उमेदवारी जाहीर केली.
सर्वांत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून मालवीयनगरचे आमदार सोमनाथ भारती आम आदमी पार्टीचे उमेदवार असतील. दक्षिण दिल्ली मतदारसंघामध्ये पक्षाने तुघलकाबादचे तीनवेळाचे आमदार सहीराम पहेलवान यांना उमेदवारी दिली आहे. पश्चिम दिल्लीतून माजी खासदार महाबल मिश्रा यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे,
सातव्यांदा गुंगारा, पुन्हा ईडीची नोटीस
दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यात यापूर्वीच्या सर्व सातही समन्सना गुंगारा देणारे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज ईडीने आठवा समन्स बजावला. ताज्या समन्सनुसार केजरीवाल यांना ४ मार्च रोजी ईडीपुढे चौकशीसाठी हजर राहायचे आहे.
केजरीवाल यांच्या असहकाराच्या पवित्र्याला शह देण्यासाठी ईडीने चालू महिन्यात त्यांच्याविरोधात न्यायालयात धाव घेतली. पण राऊज ॲव्हेन्यू न्यायालयानेही केजरीवाल यांना १६ मार्च रोजी न्यायालयात हजर होण्याचे आदेश दिले आहेत.
ईडीने समन्स बजावताना आपल्याला नेमक्या कोणत्या कारणासाठी चौकशीला बोलावले आहे हे स्पष्ट केल्यास आपण चौकशीला सहकार्य करू, अशी भूमिका केजरीवाल यांनी घेतली होती. पण आता न्यायालयानेच १६ मार्चपर्यंतची मुदत दिली आहे.
नोटीस या तारखांना
२ नोव्हेंबर, २१ डिसेंबर, ३, १७ आणि ३१ जानेवारी, १९ आणि २६ फेब्रुवारी