जाणून घ्या, जगातील सर्वात उंच पुतळा साकारणारे मराठमोळे शिल्पकार राम सुतार यांच्याबद्दल...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 11:26 AM2018-10-31T11:26:15+5:302018-10-31T12:04:09+5:30

५५0 फूट उंचीचा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा त्यांच्या कामाचा सर्वोच्च बिंदू. हे तरुण शिल्पकार म्हणजे राम सुतार.

architect Ram Sutar who is made the world's tallest Statue Of Unity | जाणून घ्या, जगातील सर्वात उंच पुतळा साकारणारे मराठमोळे शिल्पकार राम सुतार यांच्याबद्दल...

जाणून घ्या, जगातील सर्वात उंच पुतळा साकारणारे मराठमोळे शिल्पकार राम सुतार यांच्याबद्दल...

googlenewsNext

नवी दिल्ली- त्यांचे वय अवघे ९३ वर्षे; पण अजूनही त्यांचे हात सुरेख शिल्प साकारण्यात गुंतलेले. लहानपण हलाखीत गेले असले, तरी हातात सरस्वतीचा वास होता. त्यांनी साकारलेले पुतळे देशातच नव्हे, तर जगभरात मोठ्या मानसन्मानाने बसविले गेले. नुकताच गुजरातमधील सरदार सरोवर येथे साकारण्यात आलेला ५५0 फूट उंचीचा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा त्यांच्या कामाचा सर्वोच्च बिंदू. हे तरुण शिल्पकार म्हणजे राम सुतार.

या मराठमोळ्या कलाकाराला गुरुवारी ‘टागोर सांस्कृतिक ऐक्य पुरस्कार’ जाहीर झाला. शिल्पकलेत दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री, पद्मभूषण अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.


नोएडामध्येही त्यांचा स्टुडिओ आहे. या वयातही ते पायाडावर उभे राहून शिल्प साकारतात. त्यांच्या शिल्पकलेचा वारसा मुलगा अनिल, नातू समीर व नात सोनाली हे चालवित आहेत. मूळचे धुळ्याचे असलेले शिल्पकार राम सुतार यांचे वडील वनजी लाकडी वस्तू व कृषी अवजारे बनवायचे.


राम यांना वडिलांकडूनच कलाकुसरीच्या वस्तू साकारण्याचे कौशल्य मिळाले. दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांची गुरूश्रीरामकृष्ण जोशी यांच्याशी भेट झाली.
राम सुतार यांनी १९४७ साली बॉडी बिल्डरचा पहिला पुतळा बनवला. आपल्याच शाळेसाठी १९४८ साली महात्मा गांधीजींचा पुतळा बनवला. तेथून त्यांचा शिल्पकलेचा प्रवास सुरू झाला. जोशी सरांनी त्यांना मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये शिक्षण घेण्याविषयी सुचविले, शिवाय त्यांची राहण्याची व उदरनिर्वाहाची सोयही करून दिली. त्यांनी सुवर्णपदकही मिळविले.

महात्मा गांधींच्या जन्मशताब्दीनिमित्त भारत सरकारने रशिया, मलेशिया, इंग्लंड अशा विविध देशांना महात्मा गांधीजींचा पुतळा भेट दिला. गांधीजींचे भारतासह जगभरात बसविलेले जवळपास ३५० पुतळे राम सुतार यांनी साकारले आहेत. दिल्ली विमानतळावर बसविण्यात आलेला सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा, तसेच सरदार वल्लभभार्इंचा सरदार सरोवर येथे साकारण्यात येणारा ८५ फूट बेस व ५२२ फूट उंचीचा सर्वांत मोठा पुतळा बनविण्याचे काम सुतार यांच्याकडेच आहे. अरबी समुद्रात साकारण्यात येणाऱ्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे कामही त्यांच्याकडेच आहे.

संसद परिसरात १६ पुतळे
राम सुतार यांनी चंबळच्या देवीची मूर्ती साकारली होती. ही मूर्ती पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना इतकी आवडली की, त्यांना भाक्रा नानगल धरणावर ब्राँझचा पुतळा बनवण्यास सांगितले; मात्र काही कारणामुळे हा प्रकल्प अपूर्ण राहिला. त्यानंतर सुतार यांनी संसदेच्या आवारात बसविण्यात आलेले शिवाजी महाराज, महात्मा गांधी, नेहरू, इंदिरा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, भगतसिंग, महात्मा फुले, अशा थोर विभूतींचे जवळपास १६ पुतळे बनवले.

 

राम सुतार यांनी साकारलेली महत्त्वाची शिल्पे

- संसद भवनाच्या आवारातील मौलाना आझाद (१८ फूट), इंदिरा गांधी (१७ फूट), राजीव गांधी (१२ फूट), गोविंदवल्लभ पंत (१० फूट) आणि जगजीवनराम (९ फूट) असे अनेक पुतळे राम सुतार यांनी घडविले आहेत.

- छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची शिल्पंही त्यांनी घडवली आहेत.

- फ्रान्स, इटली, अर्जेंटिना, रशिया, इंग्लंड या देशांमध्येही राम सुतार यांनी साकारलेली शिल्पं पाहायला मिळतात.

- रवीन्द्रनाथ टागोर यांचा टोकियोतील पुतळा राम सुतार यांनी तयार केला आहे.

- ९३व्या वर्षीही पायाडावर उभे राहून शिल्पांना आकार; राम सुतार यांचे मोठेपण















Web Title: architect Ram Sutar who is made the world's tallest Statue Of Unity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.