नवी दिल्ली, दि. 17 - भारतीय हवाईदलाचे मार्शल अर्जन सिंह यांच्यावर सोमवारी सकाळी 9.30 वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या सन्मानार्थ राजधानीतील सर्व सरकारी इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकतील. गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्यांकडून ही माहिती देण्यात आली आहे. भारतीय हवाईदलाचे मार्शल आणि 'फाइव्ह स्टार रँक' प्राप्त अर्जन सिंह यांचं काल निधन झालं. ते 98 वर्षांचे होते. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लष्कराच्या रिसर्च अँड रेफरल रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृती नाजूक असल्याने हवाई दलाचे प्रमुख बी.एस.धनवा, केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती. हवाईदलाने अर्जन सिंह यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती दिली होती. अखेर आज त्यांचं निधन झालं.पाच स्टार मिळवणारे अर्जन सिंह एकमेव अधिकारी होते. वयाच्या 45 व्या वर्षी सर्वात तरुण हवाईदल प्रमुख होण्याचा मान त्यांना मिळाला होता. हवाईदलात सेवा बजावताना 60 वेगवेगळ्या प्रकारची विमाने त्यांनी उडवली. 1965 साली भारत-पाकिस्तान युद्धात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. 1969 रोजी अर्जन सिंह सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्त होत असतानाही अर्जन सिंह यांचा उत्साह एखाद्या तरुण अधिका-याला लाजवेल असाच होता. अर्जन सिंह चिफ ऑफ एअर स्टाफ असतानाच हवाईदलाच्या ताफ्यात सुपरसॉनिक फायटर्स, टॅक्टिकल ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट आणि अॅसॉल्ट हेलिकॉप्टर्स दाखल झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. 'अर्जन सिंह यांचं योगदान कायम स्मरणात राहिल. अर्जन सिंह यांनी देशाच्या संरक्षण क्षेत्राची ताकद वाढवली', अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. 2016 रोजी अर्जन सिंह यांच्या 97 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने पश्चिम बंगालमधील पानागड येथील हवाईदल तळाला त्यांचे नाव देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता. हवाई दलाचे पानागड विमानतळ आता अर्जनसिंग यांच्या नावाने ओळखले जाते. जिवंतपणी एका विमानतळाला नाव देण्यात आलेले ते एकमेव अधिकारी ठरले.
अर्जन सिंह यांच्यावर उद्या होणार अंत्यसंस्कार, अर्ध्यावर फडकणार तिरंगा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2017 5:04 PM